राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे पुण्यात दोन शहराध्यक्ष:दोन नेत्यांकडे सोपवली जबाबदारी, दीपक मानकर यांच्या राजीनाम्यानंतर होते रिक्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी 14 मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. समाजकंटकांकडून आपली राजकीय बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप करत, तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून कटकारस्थाने केली जात असल्याचा दावा करत त्यांनी हा राजीनामा पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. दीपक मानकर यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पुणे शहरासाठी दोन नवीन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. माजी आमदार सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये सुनील टिंगरे यांच्याकडे पूर्व पुणे शहराची जबाबदारी देण्यात आली असून, सुभाष जगताप यांच्याकडे पश्चिम पुण्याची जबाबदारी दिली गेली आहे. अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरासाठी दोन विभागीय शहराध्यक्ष नेमले आहेत. माजी आमदार सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांच्या नावांची घोषणा होण्यापूर्वी राष्ट्रवादीकडून शहरअध्यक्ष पदासाठी आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख या नावांची चर्चा सुरू होती. यातून सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांना संधी देण्यात आली आहे. शहराध्यक्षपदाच्या रेसमध्ये माजी महापौर दत्ता धनकवडे आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीकडून माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे पूर्व पुणे शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. दीपक मानकर यांनी राजीनामा का दिला होता? राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे माजी राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडे यांना पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात अनेक व्यक्तींचा सहभाग आणि मोठ्या प्रमाणावर पैशांच्या व्यवहारांचा उलगडा झाला. पोलिसांनी तपासादरम्यान शंतनू कुकडे यांच्या बँक खात्यांची छाननी केली असता, त्यांच्या आणि दीपक मानकर यांच्यात सुमारे एक कोटी रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे समोर आले. या घडामोडीनंतर, बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक मानकर यांनी आपल्या पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, तसेच आपल्या राजकीय वाढत्या लोकप्रियतेमुळे आपली बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे.