राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांची लागणार आमदारपदी वर्णी:जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पती, पत्नी राहणार आमदार

राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांची लागणार आमदारपदी वर्णी:जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पती, पत्नी राहणार आमदार

राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू, निकटवर्तीय संजय खोडके यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी सोमवारी (दि. १७) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे पाच रिक्त जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत केवळ ५ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काही अनपेक्षित न घडल्यास संजय खोडके यांची आमदारकी पक्की होणार हे निश्चित. तूर्तास नामांकन अर्ज मागे घेण्यासाठी आणखी दोन दिवस २० मार्चपर्यंत अवधी आहे. त्यानंतर अधिकृत घोषणा २७ मार्चला होईल. दरम्यान संजय खोडके आमदार होणार असल्याने अमरावतीच्या राजकारणात आता राष्ट्रवादी काँगेसची (अजित पवार) राजकीय ताकद आणखी वाढणार आहे. संजय खोडके सध्या राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. दरम्यान चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके राकाँकडूनच (अजित पवार गट) विजयी झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात महायुतीकडून सुलभा खोडके निवडणूक रिंगणात असताना भाजपचे माजी राज्यमंत्री जगदिश गुप्ता यांनी बंडखोरी केली होती. तरीही सुलभा खोडके यांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयात संजय खोडकेंचा सिंहाचा वाटा होता. तसेच शहरात राकाँ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दमदार फळी तयार करून ती कायम ठेवण्यात संजय खोडके यांची‎महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून पक्षासोबत‎जपलेले नाते आणि अजित पवारांचे विश्वासू याच कारणाने‎त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार असल्याची‎राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान सुलभा खोडके सध्या‎विधानसभेच्या, तर आता संजय खोडके विधान परिषदेचे‎आमदार होणार आहेत. त्यामुळे एकाचवेळी पती व पत्नी‎आमदार असण्याची ही जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील‎पहिलीच वेळ ठरणार आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या‎ज्या पाच जागांसाठी ही निवडणूक होऊ घातली आहे,‎त्यामध्ये सर्वाधिक ५ वर्षे ५ महिन्यांचा (२७ जुलै २०३०)‎कालावधी संजय खोडके यांना मिळणार आहे.‎ सात महिन्यांपूर्वी हाेती संजय खोडकेंच्या नावाची‎ चर्चा जुलै २०२४ मध्ये विधान परिषदेची निवडणूक झाली,‎त्यावेळी राकाँ अजित पवार गटाने परभणी जिल्ह्यातील‎राजेश विटेकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्याचवेळी‎संजय खोडके यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा‎राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र त्यावेळी पक्षाने विटेकर‎यांना उमेदवारी दिली व ते आमदार झाले. दरम्यान तीनच‎महिन्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा‎निवडणुकीत राजेश विटेकर निवडून आलेत आणि त्यांची‎विधान परिषदेतील जागा रिक्त झाली. आता त्यांच्याच रिक्त‎झालेल्या जागेवर संजय खोडके आमदार होणार आहेत.‎ पडद्यामागे राहणारे खोडके आता अधिकृतपणे व्यासपीठावर येणार सुलभा खोडके या तिसऱ्यांदा विधानसभेच्या आमदार झाल्यात. या काळात संजय खोडके कधीही सार्वजनिक कार्यक्रमात फारसे मंचावर बसलेले दिसत नव्हते. पक्षाने, आ. सुलभा खोडके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातही संजय खोडके हे सर्वसामान्यांमध्ये बसत होते. वास्तविक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक बाबीचे नियोजन संजय खोडके स्वत: करायचे मात्र ते क्वचितच मंचावर दिसायचे, आता मात्र ते आमदार, त्यातही वरिष्ठ सभागृहाचे सदस्य होणार असल्यामुळे २७ मार्चनंतर ते अधिकृतपणे व्यासपीठावर दिसतील.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment