राष्ट्रवादीचे विदर्भात जनजागरण अभियान:महागाई, बेकारी, शेतमालाचे भाव यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष; अनिल देशमुखांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सोमवारी अमरावतीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने जनजागरण अभियान सुरू केले आहे. देशमुख यांनी सांगितले की राज्यात महागाई, बेकारी, शेतमालाला भाव, महिलांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर झाले आहेत. बीड जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार औरंगजेबची कबर, छत्रपती शिवाजी महाराज आणि छावा सिनेमासारखे वादग्रस्त मुद्दे पुढे आणत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही संघटनांच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. हा सत्तेचा स्पष्ट गैरवापर आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जनजागरण अभियान सुरू केले आहे. अमरावतीनंतर अकोला जिल्ह्यात बैठक होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. बुलढाण्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.