एनआयए करणार चौकशी, आज भारतात आणला जाण्याची शक्यता:मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाचे 16 वर्षांनंतर भारतात प्रत्यार्पण निश्चित

२६-११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेहून मुसक्या बांधून भारतात आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राणा हा मूळचा पाकिस्तानी असून कॅनडाचा नागरिक आहे. त्याच्या प्रर्त्यापणामुळे मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानच्या भूमिकेचा भंडाफोड होणार आहे. ६४ वर्षीय राणा पाकिस्तानी-अमेरिकी दहशतवादी डेव्हीड कोलमन हेडलीचा नजीकचा साथीदार आहे. हेडली हा २००८ च्या हल्ल्याचे षडयंत्र रचणाऱ्यापैकी एक आहे. १६ वर्षांपूर्वी झालेल्या या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते. अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने राणाचे अखेरचे अपीलही फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याला आणण्यासाठी एक विशेष पथक अमेरिकेत तळ ठोकून आहे. राणा गुरूवारी सकाळपर्यंत भारतात पोहोचेल,असे सूत्रांनी सांगितले. प्राथमिक चौकशीसाठी त्याला एनआयएच्या ताब्यात दिले जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून राणाचा ताबा भारताला मिळावा, असे जोरदार प्रयत्न केले जात होते. गृहमंत्री अमित शाह, जयशंकर यांची विशेष बैठक राणाच्या प्रत्यार्पणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची बुधवारी विशेष बैठक झाली. यात गुप्तचर विभागाचे महासंचालक तपन डेका आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रीही उपस्थित होते.