निमगाव वाघाच्या बैलगाडा शर्यतीत धावल्या 70 बैलगाड्या

निमगाव वाघा येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यांच्या वार्षिक यात्रा उत्सवानिमित्त पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन करण्यात आले. संपूर्ण नगर जिल्ह्यातून बैलगाडा मालक व चालकांनी या शर्यतीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. बैलगाडा घाटात भिर्रर्र… ची आरोळी घुमली आणि वातावरणात ढोल ताशा व तुतारीच्या निनादाने दुमदुमले. एकाच दिवशी तब्बल ७० बैलगाड्या घाटात पळाल्या. ग्रामस्थांच्या वतीने बैलांचे स्वागत करण्यात आले. सकाळी सुरुवात झालेली शर्यत सायंकाळपर्यंत रंगली. पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शर्यतीचा आनंद लुटला. या शर्यतीमध्ये पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. यात प्रथम क्रमांक : मयूर सुरसे (भाळवणी), गिरीष वाखारे व अतुल खरमाळे (जुगलबंदी, भांडगाव), द्वितीय क्रमांक : कानिफनाथ बैलगाडा संघटना (निमगाव वाघा), स्वामी समर्थ बैलगाडा संघटना, जयराम आहेर (धुळ्या ग्रुप, गोरेगाव), तृतीय क्रमांक : गणेश कोकाटे, अभिजीत उंडे (जुगलबंदी), बाळासाहेब तन्मर (राहुरी) यांनी बक्षीसे मिळवली. वैभव पायमोडे यांनी फळीफोड प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तर घाटाचा राजा हा मानाचा सन्मान अभिजीत उंडे व गणेश कोकाटे (जुगलबंदी) यांना देण्यात आला.