निळवंडे धरणास मधुकरराव पिचड जलाशय नाव द्यावे:भाजप जिल्हा सरचिटणीस भांगरे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्प तथा निळवंडे धरणाच्या निर्मितीत राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे सर्वाधिक योगदान आहे. निळवंडे धरणातील सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांचे आदर्श पुनर्वसन करण्याच्या रूपाने आधी पुनर्वसन मगच धरण हा पिचड पॅटर्न चर्चेत आला. या धरणाच्या निर्मितीतून लाभक्षेत्रातील १८२ जिरायतदार गावांना नवसंजीवनी मिळेल. याच धरणाखाली हायड्रो प्रकल्पातून वीज निर्मिती होत आहे. मधुकरराव पिचड यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून निळवंडे धरणातून राजूर गावाला जोडणारा उड्डाणपूल तयार झाला. सुमारे २५ गावांचे दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागले. एकाच धरणातून चार कालवे काढून शेतकऱ्यांपर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यात आले. अशा निळवंडे धरणास जलनायक मधुकरराव पिचड साहेब जलाशय नाव द्यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली. मुंबईतील मंत्रालयात भाजपचे जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे यांच्यासह अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, अकोले तालुका एजुकेशन संस्थेचे सचिव सुधाकरराव देशमुख, भाजपचे अकोले मंडलाध्यक्ष राहुल देशमुख उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निळवंडे धरण निर्मिती होण्यास तब्बल ५० वर्षे लागली. अकोल्यातील मधुकरराव पिचड यांची राजकीय कारकिर्द १९७२ च्या दुष्काळानंतर सुरू झाली.