हे प्रचंड बहुमत मिळवणारे अस्वस्थ सरकार:उद्धव ठाकरे यांचा घणाघात; ‘एसंशि’ म्हणत शिंदेंवर, तर सौगात ए सत्ता म्हणत PM मोदींवर निशाणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार हे प्रचंड बहुमत मिळवणारे एक अस्वस्थ सरकार आहे. या सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाद्वारे केवळ आपले अपयश व अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, काल संपलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सरकारचे अपयश व अस्वस्थता लपवणारे होते. सरकारने 100 दिवसांत सरकार काय करणार? असा संकल्प केला होता. पण सरकारला या संकल्पाचा विसर पडला. ते या 100 दिवसांतील एकाही आराखड्यावर बोलले नाही किंवा ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. महायुतीचे सरकार आल्यानंतर बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली. स्वारगेट बलात्कार प्रकरण झाले. भ्रष्टाचाराची प्रकरणे दररोज पुढे येत आहेत. मुंबईतील रस्ते अन् लाडकी बहिणी योजनेवरून निशाणा मुंबईतील रस्ते घोटाळाही उजेडात आला आहे. संपूर्ण मुंबईत खोदकाम करण्यात आले आहे. यासंबंधी अॅडव्हान्स कुणाला व किती दिली याचे काहीच सोयरसुतक नाही. या प्रकरणी अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली, पण त्यात पुढे काय करणार यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. भ्रष्टाचाराचा पैसा कुणाच्या खिशात गेला, कोणत्या कंत्राटदारांना कंत्राटे मिळाली यावर कोणतेही समाधानकारक उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळाले नाही. हे सरकार कर्जमाफी करणार होते, त्यावर वाच्यता नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते. त्यावरही एकही शब्द बोलण्यात आला नाही. उलट लाडक्या बहिणींची वर्गवारी केली जात आहे. त्यांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. म्हणजे तुम्ही मते घेताना तुम्ही जे काही करायचे ते सरळ केले. पण आता तुम्ही लाडक्या बहिणींच्या दस्तावेजांची पडताळणी करणार. यामुळे नको ती योजना असे म्हणण्याची वेळ आली आहे. अधिवेशन कबरीपासून कामरापर्यंतच चालले उद्धव ठाकरे म्हणाले, बऱ्याच वर्षानंतर शांत असणाऱ्या नागपुरात दंगल झाली. मुख्यमंत्री या प्रकरणी सर्वांना सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या (एकनाथ शिंदे) मनात अजूनही मुख्यमंत्रीपदाचे जे काही कोंब फुटले आहेत, नको तिथे, ते कोंब अजूनही जात नाहीत. ते त्यांना छळतात की काय? हा एक प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला असावा असे वाटते. आता काल जयंत पाटील यांनी एक चांगली गोष्ट सांगितली. हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत च राहिले. बाकी काहीच नाही. हे अधिवेशन का घेतले गेले? हा प्रश्न सरकारने स्वतःला विचारला पाहिजे. या अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिले? तर या अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला व महाराष्ट्राला एक चांगले गाणे दिले असे म्हणावे लागेल. हे गाणे आज सर्वांच्या ओठांवर आहे. हेच या अधिवेशनाचे एक फलित मानावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. गेल्या अनेक वर्षांत विरोधक राज्यपालांकडे सरकारची तक्रार घेवून गेले होते. पण यावेळी ते गेले. सत्ताधारी आपल्या पाशवी बहुमताचा माज कसा दाखवत आहेत, आम्हाला काही बोलू दिले जात नाही, याची तक्रार त्यांनी राज्यपालांकडे केली. हे असे अधिवेशन होते. सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणावा लागला. असे अधिवेशन नजिकच्या काळात झाले असेल असे मला वाटत नाही. सरकारने आपले काम निटपणे केले असते तर मला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती. पण खिशात नाही आणा अन् मला बाजीराव म्हणा अशी गत या सरकारची झाली आहे. वारेमाप घोषणा केल्या गेल्या. पण पूर्तता काहीच नाही. सरकारने भोळ्याभाळ्या जनतेला थापा मारून फसवले. आता त्यांची दडपशाही सुरू झाली आहे. पण जी दडपशाही ब्रिटिशांना जमली नाही, ती यांना काय जमणार? शिवसेना एकच, ‘एसंशि’ हा केवळ एक गट उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची ‘एसंशि’ असे म्हणत हेटाळणी केली. शिवसेना एकच आहे. एसंशि (एकनाथ संभाजी शिंदे) हा एक गट आहे. त्यामुळे त्या गद्दार गटावर मी काही बोलणार नाही. शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केले. हा समाज आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते. त्यांनी लगेचच ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची आवई उठवली. पण आता बोगस हिंदुत्ववाद्यांना बरोबर पाचर बसली आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या ‘सौगात ए मोदी’वर निशाणा उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने सौगात ए मोदी ही योजना सुरू केली आहे. पण ही योजना सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात ए मोदी म्हणत आहेत. मोदी सुरुवातीला मंगळसूत्र धोक्यात आहे, आता हिंदूंचे संरक्षण कोण करणार? असे म्हणाले. जे लोक आमच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत ते आता काय म्हणतील. भाजपने आता आपण हिंदुत्व सोडल्याची घोषणा करावी. भाजपने प्रथम विष वाटले, आता धान्य वाटत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी आपले हिंदुत्व सोडले का किंवा त्यांची ही योजना केवळ बिहार निवडणुकीपर्यंतच राहणार का? हे भाजपने स्पष्ट करावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एकीकडे हे सौगात ए मोदी अभियान राबवत आहेत. तर दुसरीकडे नमाजावर बंदी घालत आहेत. ही बंदी नितीशकुमार यांच्या बिहारमध्येही घालणार काय? भाजपने हिंदुत्व सोडले की, हे केवळ निवडणुकीचे नाटक आहे? असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले? उद्धव ठाकरे यावेळी कुणाल कामराच्या मुद्यावरून सुरू झालेल्या वादावरही भाष्य केले. कुणाल कामरा काय बोलतोय त्यावर मला बोलायचे नाही. मी त्याचे वकीलपत्र घेतले नाही. पण त्याने कुणाचेही नाव घेतले नाही. त्यावर भाजप प्रतिक्रिया देत आहे. ज्यांचे नाव घेतले ते यावर काहीही बोलत नाहीत. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद निर्माण केला जात आहे. त्याच्यावर इतिहासकारांचे मत जाणून घ्या. पण अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक होणार होते. त्याचे काय झाले? असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.