एका तिथीचा क्षय; यंदा तुळशी विवाह तीनच दिवस:गुरुवारी त्रयोदशी, चतुर्दशी आली; बारस ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा
एका तिथीचा क्षय असल्याने यंदा तुळशी विवाह तीनच दिवस आहे. गुरुवार, १४ नोव्हेंबरला त्रयोदशी व चतुर्दशी एकाच दिवशी आले आहेत. याच दिवशी वैकुंठ चतुर्दशीही आहे. एक तिथी कटल्यामुळे तसेच सूर्योदयानंतर ९ वाजून ४३ मिनिटांनी त्रयोदशी संपते. त्यामुळे यंदा तुळशी विवाहासाठी जिल्ह्यातील परंपरेनुसार १३ ते १५ नोव्हेंबर असे तीनच दिवस मिळाले आहे. एरव्ही बारसेपासून (द्वादशी) ते पौर्णिमेपर्यंत चार दिवस तुळशी विवाह साजरा केला जातो, अशी माहिती ज्योतिषाचार्य पं. संजय शाहकर यांनी दिली आहे. एकादशीला उपवास असतो. देवाला नैवेद्य चालत नाही. त्यामुळे या दिवशी तुळशी विवाह करत नाहीत. तो द्वादशीपासून अर्थात बारसेपासून करतात. आषाढी एकादशीला देव निद्रेत जातात तर कार्तिक एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळेच कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी चातुर्मास संपतो. या कालावधीत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. याच दिवशी भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाशी तुळशीचा विवाह झाला होता, अशी माहिती पं. शाहकर यांनी दिली. तुळशी विवाह आटोपला की, शुभ कार्यांना सुरुवात होते. यानंतरच लग्नाचे बार उडतात. त्यामुळेच दिवाळी आटोपली की, ज्यांच्या घरी लग्न समारंभ आहे, ते तुळशी विवाहाची आतुरतेने वाट बघत असतात. विवाहाची लगबग सुरू होते. कारण, विवाहाची तारीख, वेळ, मंगल कार्यालय साखरपुड्याच्या वेळीच ठरलेले असते. ते बघता आता तीन दिवसांपैकी केव्हाही एक दिवस तुळशी विवाह आटोपून लग्नाची तयारी सुरू केली जाईल. नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत ४२ विवाह मुहूर्त : पं. शाहकर तुळशी विवाहानंतर १७ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्त आहेत. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत एकूण ४२ मुहूर्त असून, याच कालावधीत विवाह समारंभ उरकले जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात १७,२२,२३,२५, २६ व २७, डिसेंबर महिन्यात ३, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २३, २४, २६ तर जानेवारीत १६, १७, १९, २१, २२, २६, फेब्रुवारीत ३, ४, ७, १३, १६, १७, २०, २१, २२, २३, २५ आणि मार्च महिन्यात १, २, ३, ६, ७, १२, १५ तारखेला शुभ विवाह मुहूर्त असल्याची माहिती ज्योतिषाचार्यांद्वार े देण्यात आली.