एक रुपयासाठी दिव्यांग प्रवाशाला मारहाण:बसच्या चालक-वाहकाविरोधात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रवासी तिकिटाचा एक रुपया परत मागितलेच्या कारणावरून चालक व वाहकाने हिंगोली येथील विनंती बस थांब्यावर दिव्यांग प्रवाशाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता 26 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंधार येथून रिसोड कडे जाणाऱ्या बस मध्ये कळमनुरी येथून दिव्यांग असलेले उत्तम लोंढे हे प्रवासी सायंकाळच्या सुमारास बसले होते. लोंढे हे त्यांच्या गावी एका नातेवाईकांच्या सावडण्याचा कार्यक्रम साठी जात होते . बस मध्ये बसल्यानंतर त्यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या सवलतीच्या घराचे तिकीट वाहकाकडे मागितले. सदरील तिकीटदर 9 रुपये होता. त्यानुसार लोंढे यांनी वाहकाकडे दहा रुपये दिले आणि तिकीट घेतले. वाहकाने त्यांना एक रुपया परत दिला नाही. दरम्यान सायंकाळच्या सुमारास बस हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर थांबल्यानंतर लोंढे हे बसमधून खाली उतरले. त्यांनी वाहकाकडे तिकीट दरातील शिल्लक असलेला एक रुपया परत मागितला. मात्र वाहकाने त्याच्याकडे एक रुपया चिल्लर असतानाही लोंढे यांना दिला नाही. याउलट वाहकाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी चालकही वाहकाच्या मदतीला धावला. दोघे मिळून लोंढे यांना शिवीगाळ करत असताना लोंढे यांनी मोबाईल मध्ये छायाचित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालक व वाहक दोघेही शांत झाले. मात्र लोंढे यांनी मोबाईल बंद केल्यानंतर चालक व वाहक आणि त्यांना बसमध्ये ओढून शिवगाळ करून मारहाण केली. तसेच तुझी बघून घेतो अशी धमकीही दिली. त्यानंतर बस घेऊन निघून गेले. या प्रकारामुळे घाबरलेल्या लोंढे यांनी थेट हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी बस वाहक एस. बी. घुगे व चालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार संजय मार्के, अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत.