फक्त आठवी पास भरत गोगावले सर्वात कमी शिकलेले मंत्री:18 जण पदवीधर, 9 जण बारावी, दोघे दहावी पास 5 जण पदव्युत्तर पदवीधारक
राज्याच्या मंत्रिमंडळाचा महाविस्तार रविवारी उपराजधानी नागपूरमध्ये पार पडला. ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळातील तब्बल २३ मंत्र्यांवर गुन्हे नोंद आहेत. ९ मंत्री बारावीपर्यंत शिकलेले आहेत, तर दोन जण दहावी पास आहेत. ५ मंत्री हे पदव्युत्तर पदवी मिळवलेले आहेत, तर चार जणांनी पदविका पूर्ण केली आहे. १८ जण पदवीधर आहेत. फक्त आठवी पास भरत गोगावले हे सर्वात कमी शिकलेले मंत्री आहेत. शिंदे सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. पण त्यांना यश मिळाले नाही. शेवटच्या टप्प्यात त्यांना एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते. महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले होते. कुणाला संधी व कुणाला डच्चू मिळतो यावर चर्चा झडत होत्या. अखेर, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपराजधानी नागपूरमध्ये रविवारी मंत्रिमंडळाचा महाविस्तार पार पडला. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या ३९ आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. दिव्य मराठीने या ३९ मंत्र्यांच्या शिक्षण, वय, गुन्हे व संपत्तीची त्यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीवरून विश्लेषण केले. ७ वकीलही मंत्रिमंडळात
महायुती मंत्रिमंडळात सात वकील आहेत. मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस हे वकील असून त्यांच्याशिवाय ६ जणांनी वकिलीची पदवी घेतली आहे. पंकज भोयर हे डॉक्टरेट मिळवलेले एकमेव मंत्री आहेत. नाईक सर्वात ज्येष्ठ, अदिती सर्वात तरुण
मंत्रिमंडळात १६ मंत्री साठीपार असून भाजपचे नवी मुंबईतील नेते, ७४ वर्षीय गणेश नाईक हे सर्वात ज्येष्ठ मंत्री असणार आहेत, तर अजित पवार गटाच्या ३६ वर्षीय अदिती तटकरे सर्वात तरुण मंत्री आहेत. तटकरे यांची मंत्रिपदाची दुसरी टर्म आहे. २३ मंत्र्यांवर गुन्हे, नितेश राणेंवर सर्वाधिक ३८
शपथ घेतलेल्या ३९ पैकी २३ मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. यात भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर सर्वाधिक ३८ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्यानंतर भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यावर १२ आणि शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यावर ९ गुन्ह्यांची नोंद आहे. १६ मंत्र्यांवर एकही गुन्ह्याची नोंद नाही. सर्वात श्रीमंत : मंगलप्रभात लोढा, सर्वात गरीब : दादा भुसे
भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत मंत्री असून त्यांची एकूण संपत्ती ४४७ कोटी ९ लाख २३ हजार रुपये इतकी आहे. त्यानंतर शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा नंबर असून त्यांची संपत्ती ३३३ कोटी ३२ लाख ९५ हजार रुपये इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे शिवेंद्रराजे भोसले असून त्यांची संपत्ती १२८ कोटी ४१ लाख ८१ हजार रुपये इतकी आहे, तर शिवसेनेचे दादा भुसे सर्वात गरीब मंत्री असून त्यांची संपत्ती १ कोटी ६० लाख ८५ हजार रुपये इतकी आहे.