आमचा राजू विकणारा नाही, तर टिकणारा आहे:डोंबिवली येथे राज ठाकरेंची पहिली प्रचार सभा, महायुती आघाडीवर हल्लाबोल
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरू होत आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची डोंबिवली येथे पहिली प्रचार सभा आयोजित करण्यात आली असून राज ठाकरे यांनी मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, निवडून येणाऱ्या जागांवर माझ्या पहिल्या सभा ठेवल्या आहेत. कालच दिवाळी संपली आता आजपासून आमची दिवाळी सुरू होणार. या संगीता भोईर ज्यांनी बदलापूरचे प्रकरण बाहेर काढले. बाकी कोणाला कळले नव्हते. या एका भगिनीने हे सगळे प्रकरण बाहेर काढले, लोकांपर्यंत गेले आणि महाराष्ट्र प्रशासन हांदरवून टाकले. त्यांना शाबासकी म्हणून मी त्यांना उमेदवारीचे तिकीट दिले आहे. खरेतर आजची ही पहिली सभा आहे. अजून सगळेच तापायचे आहे. कुठूनतरी सुरुवात करावी लागते. आज जे आलो आहे ते केवळ तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुमच्याकडून हमी घेण्यासाठी आलो आहे की जिथे जिथे मनसेचे उमेदवार असतील तिथे त्यांना निवडून आणायचे आहे. आमचा राजू विधानसभेत एकटा होता
गेले पाच वर्ष आपण हा महाराष्ट्र पाहत आहोत, काय चालू आहे या महाराष्ट्रामध्ये? ज्यांनी 2019 ला मतदान केले, तेव्हा युतीमध्ये कोण होते आणि आघाडीमध्ये कोण होते? आणि आता कोण कुठे आहे? तुमचं मत नेमकं आहे कुठे? खरेतर या सगळ्या गोष्टींची तुम्ही उजळणी केली पाहिजे, 5 वर्षानंतर मतदान होत आहे. कोणी कुठेही गेले आहे. आमचा राजू विधानसभेत एकटा होता, आणि मला अभिमान आहे की आमचा माणूस हा विकणारा नाही तर टिकणारा माणूस आहे. नाहीतर सहज माझी निशाणी घेऊन कुठेतरी जाऊन बसला असता, एकटाच तर होता. पण असल्या गोष्टी माझ्या सहकाऱ्यांना शिवत नाहीत. राज ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावला
शिवसेना आणि भाजप यांच्यासमोर कोण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस. 2019 ला निवडणुका झाल्या, निकाल लागले मग एक सकाळचा शपथविधी झाला. ते 15 मिनिटात लग्न तुटले करण काकाने डोळे वटारले मग लगेच आले घरी ‘काका मला माफ करा’, असे म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या त्यांच्या सोबत जाऊन उद्धव ठाकरे बसले. काय सांगितले म्हणे, अमित शहांनी सांगितले होते की मला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची हमी दिली होती. मी मागे म्हणले होते, तुमच्या समोर या उद्धव ठाकरेंच्या समोर, उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना नरेंद्र मोदींनी सांगितले होते की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. अमित शहांची सभा सुरू असताना तेही म्हणाले होते आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मग तेव्हा आक्षेप का नाही घेतला? असा सवाल उपस्थित केला. खुर्चीसाठी इथपर्यंत खाली गेलात तुम्ही?
उद्धव ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यावर लाजिरवाणी गोष्ट म्हणजे सगळ्या फोटोवरून बाळासाहेबांच्या आधी लागणारे हिंदूहृदय सम्राट हे नावच काढून टाकले. काही तर उर्दू बॅनर बघितले त्यावर तर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलेले असायचे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी इथपर्यंत खाली गेलात तुम्ही? अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. हे कॉंग्रेससोबत गेले आणि खालच्या खाली 40 गेले. कुठे गेले? निसर्ग बघायला गेले होते? 40 आमदार निघून गेले मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही. अचानक कळते की मांडीवर येऊन आता अजित पवार बसलेत
40 आमदार घेऊन जाणारे एकनाथ शिंदे हे काय म्हणाले होते? कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यातल्या त्यात अजित पवारांसोबत मांडीला मांडी लाऊन बसने अशक्य आहे. श्वास गुदमारतो आमचा. अचानक कळते की मांडीवर येऊन आता अजित पवार बसलेत. आता काही करता पण येत नाहीये. कोणते राजकारण सुरू आहे? काय चालू आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्या करतोय, महाराष्ट्रातले तरुण तरुणी काम मागत आहेत, कामगार कसाबसा काम करत आहेत, आणि यांची मजा चालू आहे. याच लोकांना तुम्ही वारंवार मतदान करता. फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली
राज ठाकरे म्हणाले, शरद पवारांनी पहिल्यांदा कॉंग्रेस फोडली, 1992 ला शिवसेना फोडली, 2005 ला परत नारायण राणेला फोडले. आता पुढे गेले सगळे प्रकरण. आता नुसते फोडाफोडीवर राहिले नाही, तुमचे पक्षच ताब्यात घ्या, निशाणीच ताब्यात घ्या, हे तर मी कधी बघितले नव्हते. एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे नाव घेतले, चिन्ह घेतले, अजित पवारांनी नाव घेतले, निशाणी घेतली. ते जे नाव आहे न शिवसेना आणि धनुष्यबाण आहे न ती ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी आहे ना त्या उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे, ती बाळसाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही, तुमच्या स्वार्थासाठी आमदार फोडाफोडीचे राजकारण करायचे आहे करा, माझे कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि घड्याळ हे शरद पवारांचे आपत्य आहे, ते अजित पवारांचे नाही. महाराष्ट्रात व्यासपीठावर बाई नाचवणे सुरू झाले
राज ठाकरे म्हणाले, कोणतातरी एक व्हिडिओ आला होता. एका व्यासपीठावर एक बाई नाचत आहे, व्यासपीठावर एकनाथ शिंदेचा फोटो होता. ही बाई एका भोजपुरी गाण्यावर नाचत आहे. लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून. व्यासपीठावर उमेदवाराचे नाव आहे, या आशा व्यासपीठावर बाई नाचत आहे भोजपुरी गाण्यावर, ही आहे तुमची लाडकी बहीण योजना? हे असले नाचगाणे आपल्याकडे नव्हते, हे तिकडे चालायचे बिहारमध्ये, आता हे आपल्याकडे सुरू झाले? यातून आपल्याला महाराष्ट्र वाचवणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.