पहलगाम हल्ला:केंद्र- पर्यटकांना मोफत प्रवासाची घोषणा, राज्य- ट्रॅव्हल्स कंपनीस दिले 65 लाख, केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समन्वयाचा अभाव

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ८०० हून अधिक पर्यटक काश्मीरहून आणल्याचा दावा केला होता. त्यासाठी गिरिकंद ट्रॅव्हल्स प्रा. लि.ला महसूल व वन विभागाने (मदत व पुनर्वसन) सुमारे ६४.०१ लाख रुपये अदा केल्याचेही सांगितले. मात्र, दुसरीकडे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यातील सर्व पर्यटकांना मुंबईत मोफत आणले जाईल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे राज्य सरकार खरे बोलत आहे की केंद्र सरकार, याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. तीन शासनादेश काढून दिले गिरिकंद ट्रॅव्हल्सला पैसे राज्य सरकारने तीन शासनादेश जारी करून ही रक्कम गिरिकंद ट्रॅव्हल्सला दिली आहे. पहिल्या सरकारी आदेशात गिरिकंद ट्रॅव्हल्सला एकूण ११ लाख ६५ हजार २३४ रुपये, दुसऱ्या आदेशात १३ लाख ७४ हजार ९७६ रुपये आणि तिसऱ्या आदेशात ३८ लाख ६१ हजार ४० रुपये देण्यात आले. गिरिकंद ट्रॅव्हल्सचे विनायक वाकचौरे यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आमच्या कंपनीने एअरलाइन्स कंपनी आणि डीजीसीएशी बोलून तिकिटांची व्यवस्था केली. अशा प्रकारे पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्याच्या राज्य सरकारच्या कामात आमच्या कंपनीने सहकार्य केले. यासाठी आम्हाला राज्य सरकारकडून पैसे मिळाले आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. यावरून आता राजकारण होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणून दिले पैसे- राज्य पुणे, रायगड, ठाणे, मुंबई व नागपूर येथून काही पर्यटक जम्मू-पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले होते. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना व मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसास आर्थिक मदत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. ६ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि ७ जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत देण्यात आली. त्याचप्रमाणे, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विशेष बाब म्हणून पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठीच्या विमान प्रवासाचा खर्च शासनाने करण्याचाबाबतचा निर्णय घेतला होता. म्हणून आता गिरिकंद ट्रॅव्हल्स प्रा. लिमिटेडला पैसे दिले आहेत. आजवर ५०० पर्यटकांना आणले- केंद्र पर्यटकांना सुरक्षितपणे मुंबईत आणण्याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता एक निवेदन जारी केले. २४ एप्रिल २०२५ रोजी श्रीनगर ते मुंबई दोन विशेष विमानांची मोफत व्यवस्था करण्यात आली. पहिले विमान इंडिगो 6E3251 मध्ये ८३ प्रवासी तर दुसऱ्या विमान एअर इंडिया AI1662 मध्ये १०० प्रवासी होते. इंडिगोचे तिसरे विमान २३२ नागरिकांना घेऊन शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत पोहोचणार आहे. यामुळे सुमारे ५०० लोक आधीच सुरक्षितपणे घरी पोहोचले आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगले काम केल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आता केंद्राने पर्यटकांना मोफत आणले की राज्याचे पैसे दिले, याबाबत एकच चर्चा सुरू आहे.