पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आंदोलन:पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा, दहशतवादाचा नायनाट करण्याची केली मागणी

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आंदोलन:पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा, दहशतवादाचा नायनाट करण्याची केली मागणी

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथील पक्ष कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यानंतर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी दहशतवादाचा नायनाट करा, अशा आशयाचे फलकही कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. निष्पाप नागरिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा पूर्णपणे नाश व्हावा हीच माझ्यासह सर्व सामान्य भारतीयाची आज मागणी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, संपूर्ण देशातच या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात असून हल्ला करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. राजधानी दिल्लीत हालचालींना वेग दरम्यान, राजधानी दिल्लीत आता हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या हल्ल्याचे भारत दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणार असे निश्चितच झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील हा हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस आणि तिन्ही सैन्यदल प्रमुखांची बैठक घेतली आहे. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. ही बैठक जवळपास साडे तीन तास सुरू होती. बैठकीत सैन्यदलांच्या तिन्ही प्रमुखांनी पाकविरोधी कारवायांचे पर्याय राजनाथ सिंहांसमोर ठेवले. आता हे तीनही पर्याय संध्याकाळी होणाऱ्या सीसीएसच्या बैठकीत पंतप्रधान मोदींसमोर मांडण्यात येणार आहेत. कोल्हापुरात मुस्लिम संघटनांकडून हल्ल्याचा निषेध काश्मीरमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौकात मुस्लिम संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मुस्लिम महिला हातात फलक घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ज्यांनी हल्ला केला त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच हिंदू-मुस्लिम यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी हेल्पलाईन पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे पहलगामच्या विविध भागात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्याची कारवाई महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. तसेच मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर पर्यटक व नातेवाईकांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment