‘पहलगाम’च्या आधीही हल्ले, पण यावेळी धर्मावर चर्चा का?:शरद पवार म्हणाले- शहांना काढा म्हणणार नाही, पण दहशतवाद्यांवर सक्त कारवाई करा

पहलगामच्या आधी देखील भारतावर अनेक वेळा हल्ले झाले. त्यावेळी कधीही धर्मावर चर्चा झाली नाही. यावेळी धर्मावर चर्चा का? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. झाले ते दुर्दैवी आहे. हा देशावरील हल्ला आहे. घडले ते वाईटच आहे. हे देशाला आव्हान आहे. याला आपल्याला सक्तीने तोंड द्यावेच लागेल. त्यानिमित्ताने धार्मिक अडचण वाढेल असे काम कोणीही करू नये, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे. धर्म विचारून गोळीबार करण्यात आला असे म्हणतात. मात्र, याबाबत सत्य काय हे मला माहित नाही. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्त्रियांना दहशतवाद्यांनी हात लावला नाही. केवळ माणसांना मारण्यात आले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शहांच्या राजीनाम्यावर म्हणाले की… केंद्र सरकारने काल घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत चूक झाल्याचे सांगितले. मग गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, भारतावर ज्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून काढा. त्यांच्यावर सक्त कारवाई करा. त्यामुळे कुणाला काढा, असे आज मी बोलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 370 कलम हटवल्यानंतर केंद्र सरकार बधाई घेत होते जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर केंद्र सरकार बधाई घेत होते. मात्र काश्मीरी जनतेचे मत अजूनही वेगळे असावे, असे दिसत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. सर्व काही शांत आहे, आता काही भीती नाही, असा सरकारचा दावा होता. यावरून आता शरद पवार यांनी टीका केली आहे. हा देशावर हल्ला, यात राजकारण नको हा देशावर झालेला हल्ला आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण नको, अशी भेट भूमिका देखील शरद पवार यांनी मांडली आहे. सरकार जो निर्णय घेईल, त्या निर्णयात सर्व पक्ष सरकारच्या बाजूने उभे असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. ज्यावेळेस सीमेवर अशा पद्धतीच्या कारवाया होतात. त्यावेळी शासन असो किंवा विरोधी पक्ष सर्वांनी याकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे. असा वेळी कटुता कशी कमी होईल याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. काश्मीरमधील लोक भारताच्या बाजूने उभे राहिले, ही सकारात्मक बाब ज्याने हल्ले केले त्यांना शोधून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोणाला काढा, कोणाला ठेवा, याविषयी आज बोलणार नसल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी काश्मीरमधील लोक रस्त्यावर आले आणि ते भारताच्या बाजूने उभे राहिले. ही अतिशय सकारात्मक बाब असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. स्थानिकांना झळ बसणार मात्र, आता जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटक जाणार नाहीत आणि त्याची झळ तेथील स्थानिक नागरिकांना बसेल याची चिंता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या वतीने या संदर्भात पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. एका दृष्टिकोनातून पाकिस्तानला एक मेसेज देण्याचा प्रयत्न असल्याचा शरद पवार यांनी म्हटले आहे.