पाकिस्तानचे पाणी बंद केले नाही:भारत सरकार खोटे बोलतंय, जनतेची दिशाभूल करतंय; प्रकाश आंबेडकरांनी पत्र दाखवत केला दावा

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी 24 एप्रिल रोजी भारत सरकारने पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताने अद्याप पाकिस्तानचे पाणी थांबवलेले नाही. सरकार खोटे बोलत आहे आणि जनतेची दिशाभूल करत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर भारताने पाकिस्तानविरोधात पाच मोठे निर्णय जाहीर केले. त्यामध्ये सर्वात गाजलेला निर्णय म्हणजे, भारताने सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे असे सांगण्यात आले. आता या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? पाकिस्तानला पाणी बंद केल्याचे पत्र देण्यात आले आहे. मात्र पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातले पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेही पत्रात उल्लेख केलेला नाही. याचाच अर्थ सिंधू पाणी वाटप करार भारत सरकारने रद्द केलेला नाही, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को असे हे पत्र आहे. त्यामुळे त्यांनी जर जनतेला हे पत्र दाखवले, तर सरकार नेमकी कुठल्या प्रकारची कारवाई करतय हे समोर येईल, असेही ते म्हणाले. हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळे झाक करू नये. या सगळ्यात फक्त पाकिस्तानी नागरिकांचा भुसार रद्द करून त्यांना बाहेर काढता येत आहे, एवढीच वस्तूस्थिती असल्याचेही आंबेडकर म्हणाले. इंडस कराराबात मांडली भूमिका सिंधू जल कराराबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, कोणताही करारनामा लगेच रद्द करता येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. पण मी म्हणतो भाडमध्ये गेलं ते रद्द केलाय तर केला रद्द. मात्र, त्याची फॉलोअप ऍक्शन घ्या ना. जे समोर आले त्यात धरणातील गाळ काढणार, पाणी अडवणार याला 10 वर्षे लागतील, असेही आंबेडकर यांनी म्हटले. …त्यामुळेच पाकिस्तानचे नेते तुम्हाला उचकावत आहे दरम्यान सिंधू वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून सातत्याने पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की, भारत पाणी थांबू शकत नाही. कारण ते थांबवण्यासाठीची व्यवस्था आहे का? पावसाळ्यापूर्वी ती व्यवस्था होऊ शकते का? त्यामुळेच पाकिस्तानचे नेते तुम्हाला उचकावत आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.