पाककृती स्पर्धेत दिघी महल्ले जि. प. शाळा ठरली अव्वल

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत दिघी महल्ले येथील जिल्हा परिषद शाळा प्रथम, तर तळेगाव येथील जिल्हा परिषद मुलींची शाळा द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली असून तृतीय क्रमांक वरुड बगाजी येथील जिल्हा परिषद शाळा शाळेने पटकावला. सध्याच्या बदलत्या जीवनपद्धती आणि फास्ट फूडच्या काळात मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतो. त्याच बरोबर या काळात हेल्दी तृण धान्यांचा वापरही आहारात कमी दिसतो. नवीन पिढीला तृणधान्यांचे महत्त्वही माहित नाही. मात्र, तृणधान्य हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. त्याचा आहारात समावेश व्हावा म्हणून त्याच्या वेगवेगळ्या पदार्थांची स्पर्धा भरवण्यात आली होती. यामध्ये शाळेत आहार शिजवणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये तृण धान्यापासून बनलेले एक ना अनेक आरोग्यदायी पदार्थ बघायला मिळाले.धामणगाव रेल्वे पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा (दिघी महल्ले), द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा (तळेगाव दशासर), तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेने (वरूड बगाजी) प्राप्त केला. मंगरुळ समूह साधन केंद्रांचे प्रमुख डी. एस. राठोड, दिघी महल्ले शाळेचे मुख्याध्यापक अशोक खंडारे, प्रशांत अजमिरे, विषय शिक्षिका रश्मी कासदेकर, विजय आडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या स्वयंपाकी व मदतनीस रूपाली चौधरी, कमला अमझरे यांनी सहभाग नोंदवला होता.