पालकमंत्री पदाबाबत ‘देवा’लाच माहिती:आपल्याकडे 33 कोटी देव; चर्चा करून प्रश्न सुटणार, मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याची चर्चा
पालकमंत्री पदाबाबत ‘देवा’लाच माहिती आहे. आपल्याकडे 33 कोटी देव आहेत. त्यामुळे आता रायगड आणि नाशिक बाबत चर्चा करूनच प्रश्न सुटणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. राज्यातील नासिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदात बाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावर गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केले आहे. ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात दरवर्षी शासकीय महापूजा पार पडते. त्यानुसार दरवर्षीही महापूजा ही पालकमंत्र्यांच्या हस्ते होत असते. मात्र, यंदा नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षीचा मान गिरीश महाजन यांना देण्यात आला. शासकीय पूजेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मला आज सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी पूजा करण्याचा योग आला आहे. अमित शहा यांच्यासोबत देखील मी काल त्र्यंबकेश्वर मध्ये आलो होतो. आज पुन्हा पूजेसाठी आलो आहे. मी चौथ्यांदा येथे पूजा केली असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. दादा भुसे आणि भरत गोगावले यांची नाराजी राज्य सरकारच्या वतीने काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र यामध्ये रायगडमधून आदिती तटकरे आणि नाशिक मधून भाजपचे गिरीश महाजन यांच्या नियुक्तीवरून वाद वाढला होता. नाशिक मधील शिंदे गटाचे दादा भुसे तर रायगड मधून भरत गोगावले यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद पाहता या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमधील वाद देखील समोर आला आहे. यावरच आता मंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केले आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून देखील गिरीश महाजन यांचे नाव घोषित सध्या उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. या पुढचा कुंभमेळा हा नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे पार पडणार आहेत. कुंभमेळा मंत्री म्हणून देखील गिरीश महाजन यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. याविषयी देखील त्यांनी भाष्य केले. आपण सुरक्षित कुंभमेळा करू. आम्ही तयारीला सुरुवात देखील केली असल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या कुंभमेळा भव्य दिव्य करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.