पाण्याच्या टाकीत उतरलेल्या 4 कामगारांचा मृत्यू:गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज, एकाची प्रकृती गंभीर; मुंबईतील नागपाडा येथील घटना

पाण्याच्या टाकीत उतरलेल्या 4 कामगारांचा मृत्यू:गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज, एकाची प्रकृती गंभीर; मुंबईतील नागपाडा येथील घटना

मुंबईतील नागपाडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याची टाकी साफ करत असताना गुदमरून चार सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर एक कामगार गंभीर जखमी झाला असल्याचे समजते. एका बांधकामाधीन इमारतीत ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, बीएमसीचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले आहेत. या कामगारांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून गुदमरलेल्या चार कामगारांना मृत घोषित केले आहे. एक कामगार गंभीर अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. या अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईच्या नागपाडा परिसरात असलेल्या बिस्मिल्ला स्पेस या निर्माणाधीन इमारतीच्या तळघरातील एका पाण्याच्या टाकीत हे पाच कामगार उतरले होते. पाण्याच्या टाकीत लावण्यात आलेले खांब काढण्यासाठी आणि ती टाकी साफ करण्यासाठी हे कामगार उतरले. मात्र, बराच वेळ झाला तरी हे कामगार बाहेर आलेच नाहीत. त्यामुळे इतर कामगारांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या पाच कामगारांना टाकीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी या कामगारांना तपासून 4 जणांना मृत घोषित केले, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. पाण्याच्या टाकीची साफसफाई करताना गुदमरूनच त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हसीबुल शेख, राजा शेख, जलालू शेख, इमानदू शेख अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर पुरहन शेख या कामगाराची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11-11.30 च्या सुमारास ही घटना घडली. जेजे मार्ग पोलीस ठाण्यांतर्गत मस्तान तालाबजवळील दिमतीमकर रोडवरील बिस्मिल्ला स्पेस नावाच्या बांधकामाधीन इमारतीमधील भूमिगत पाण्याच्या टाकीत हे सर्व उतरले होते. सुरुवातीला पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी नंतर या घटनेला दुजोरा देत चार मजुरांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment