पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट:मराठवाड्यातील समस्यांवर, कामगारांच्या स्थलांतरावर झाली चर्चा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी मराठवाड्यातून होणाऱ्या स्थलांतरावर पंकजा मुंडे यांनी चर्चा केली. याबद्दलची माहिती पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळावर देखील चर्चा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेतल्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी अभिनंदन केले. तसेच यावेळी मराठवाड्याच्या मुद्द्यांवर, विशेषत: दुष्काळ निर्मूलन आणि काही भागातील बेरोजगारी सोडवण्याच्या मुद्यावर चर्चा केली. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास भाग आणि बीडमधील स्थलांतरित कामगारांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पंकजा मुंडे यांची देखील मंत्रिपद मिळवण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्याला भाजपकडून दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यात पंकजा मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबतच भाजप आमदार अतुल सावे यांना देखील मंत्रिपद मिळू शकते. येत्या 4-5 दिवसात मंत्रिपद कोणाला मिळणार हे निश्चित होणार आहे. राज्यात महायुती सरकार आल्यावर 5 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडला आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.