पॅरा खेलो इंडिया स्पर्धा – रविवारी जिंकली 8 पदके:महाराष्ट्राच्या आदिलला सुवर्ण, सोनमला रौप्य

पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकूण ८ पदके जिंकली. तिरंदाजीत आदिल अन्सारी, नेमबाजीत सागर कातळे व धावपटू दिलीप गावीतने सुवर्णपदक पटकावले. तसेच तिरंदाजीत राजश्री राठोडने, पॉवरलिफ्टिंगमध्ये शुक्ला बीडकर, सोनम पाटील यांन रौप्यपदक जिंकून दिवस गाजवला. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तिरंदाजीत मुंबईच्या आदिल अन्सारीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरूषाच्या डब्ल्यू १ प्रकारात सलग दुसऱ्या स्पर्धेत आदिलने सुवर्ण वेध घेतला. अंतिम फेरीत हरियाणाच्या नवीन दलालविरूध्द आदिलची सुरूवात खराब झाली होती. पहिल्या दोन फेर्यात पिछाडीवर असताना अंतिम फेरीत अचुक नेम साधत आदिलने सुवर्णपदक खेचून आणले. १२३ गुणांसह अवघा २ गुणांनी आदिलने बाजी मारली. पॉवरलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४१ किलो गटात कोल्हापूरच्या ३५ वर्षीय शुक्ला बीडकरने ५० किलो वजन उचलून आणि ४५ किलो गटात सोनम पाटीलने ५९ किलो वजन उचलत रौप्यपदक मिळवले. दुसरीकडे, अॅथलेटिक्समध्ये कोल्हापूरचा साईवर्धन पाटील, कराडचा साहिल सय्यद, चैतन्य पाठक हे रूपेरी यशाचे मानकरी ठरले. पुरुषांच्या एफ ३७ लांब उडी प्रकारात कोल्हापूरच्या साईवर्धनने ११.५९ मीटर उडी घेत दुसरा क्रमांक मिळवला. तसेच कराडच्या साहिल सय्यदने गोळाफेकमध्ये ७.८२ मीटरचा टप्पा गाठत रौप्य मिळवले. महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत टी-५३, ५४ प्रकारात गीता चौहानने २८.५१ सेकंदात कांस्यपदक प्राप्त केले. यवतमाळची राजश्री राठोड चमकली : महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात यवतमाळच्या राजश्री राठोडला आंतरराष्ट्रीय खेळाडू पूजाने ६-४ च्या फरकाने नमवले. ३ वर्षाची असताना राजश्रीचा उजवा पाय गुडघ्यापासून अंधू झाला होता. राजश्री ही शेतमजूरांची मुलगी आहे. मेहनत करत सराव करते.