परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा:धनंजय मुंडेंना तिथला पंतप्रधान करा, जितेंद्र आव्हाडांचा टोला

परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा:धनंजय मुंडेंना तिथला पंतप्रधान करा, जितेंद्र आव्हाडांचा टोला

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता चांगलाच वेग आला असल्याचे दिसत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच परळी येथे कराड कुटुंबीय तसेच समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. तसेच या आंदोलनात वाल्मीक कराडची आई देखील सहभागी झाल्याचे दिसून आले. एकंदरीतच परळीमध्ये काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर 307 देखील दाखल करा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा आणि धनंजय मुंडेंना पंतप्रधान घोषित करा, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे. तसेच परळीमध्ये अजूनही अनेक पोलिस अधिकारी वाल्मीक कराडनेच नेमलेले आहेत, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान, वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच कराड कुटुंब व समर्थकांनी आंदोलन सुरू केले. यावेळी जाणून बुजून वाल्मीक कराडला अडकवले जात असल्याचा दावा कराडच्या आईने केला आहे. तसेच त्यांच्यावरील गुन्हा जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. परळीमध्ये काही समर्थकांनी स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकत स्वतःला पेटवण्याचा देखील प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. वाल्मीक कराडवर गुन्हा दाखल होताच परळी बंदची हाक देण्यात आली. याला परळीमधील व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेवल्याचे दिसून आले. काही भागात टायर जाळत समर्थकांनी निषेध व्यक्त केला तर दुसरीकडे एसटी बसवर दगडफेक झाल्याची देखील घटना घडली आहे. त्यामुळे परळी येथील परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment