पशुखाद्याचे दर वाढल्याने दुग्धव्यवसाय अडचणीत:शेतकऱ्यांना जनावरे काढावी लागली विक्रीला, गायरानांची संख्या घटल्याने चारा मिळेना

प्रतिनिधी | पिंपळदरी गेल्या काही महिन्यांत पशुखाद्याचे दर वाढल्याने पशुपालन व दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. पशुखाद्य दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, पशुधन विकलेले बरे, पण दूध व्यवसाय नको अशी म्हणण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या काही वर्षांत शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांकडून दूध व्यवसाय वाढविण्यास सुरुवात झाली आहे. घरचा मुबलक चारा आणि मनुष्यबळ असल्याने हा दूध व्यवसाय परवडत होता. परंतु आता घरच्या मनुष्यबळाचा अभाव व गावागावातील गायरानांची कमी झालेली संख्या यामुळे विकतच्या पशुखाद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे इतर खर्च लक्षात घेता दुधाला मिळणारा दर खर्चाच्या तुलनेत खूपच कमी असून, शेतकऱ्याला दूध व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. पशुखाद्याचे दर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढतात, परंतु त्यावेळी शेतकऱ्यांकडे शेतातील हिरवा चारा मुबलक प्रमाणात असतो. विकतच्या पशुखाद्याला मागणी कमी असते. परंतु सध्या पशुखाद्याचे दर कमी झाले असले तरी शेतकऱ्यांना पशुखाद्य खरेदी करणे आवाक्याबाहेर गेले आहे. दुधाला फॅट यायची असेल तर विकतचे पशुखाद्य घेतल्याशिवाय पर्याय नाही. यामुळेच दर कमी होऊनदेखील पशुखाद्य खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीला काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पशुखाद्याचा वाढता खर्च सरकी पेंड १७०० , खापरी पेंड १७०० ते २९००, सुग्रास बॅग १३०० ते १७०० असे पशुखाद्याचे दर आहेत. लसीकरण उपचार आणि पशुवैद्यकीय सेवा यावर मोठा खर्च होतो. विकतच्या चाऱ्यावर जनावरे कसे पोसणार, हिरवा चारा म्हणून ऊस आणि मका मिळणे अवघड झाले आहे. वाहतूक खर्चही वाढला आहे. शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज ^गेल्या काही वर्षांत पशुखाद्य, चाऱ्याचा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. शासनाकडून योजना आणल्या जातात, पण जाचक अटींमुळे गरजू शेतकरी लाभापासून वंचितच राहतात. आता शेतकऱ्यांना दूध व्यवसाय करणे कठीण झाले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. – गणेश घोडे, शेतकरी, पशुपालक, पिंपळदरी