पाथर्डीचे जनजीवन पावसाने विस्कळीत:शहरातील अनेक दुकाने, घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी, झाडे कोसळले, रस्त्यांची दुरवस्था

शहर व परिसरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. विजांच्या कडकडाटाने काही सेकंदातच शहरात संचारबंदीसारखे वातावरण झाले. तळघरातील दुकाने, सखल भागातील बंगल्यांमध्ये पाणी शिरले. तीव्र वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. शहर परिसरातील वस्त्यांमध्ये झाडाच्या फांद्या पतंगासारख्या फिरत होत्या. खेरडा रस्ता, चांदगाव रस्ता भागात झाडांचे मोठे नुकसान झाले. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला सरींच्या स्वरूपात पडणाऱ्या पावसाने काही क्षणातच आक्राळ विक्राळ रूप धारण केले. लगेच वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर चार वाजेपर्यंत आणखी तीन वेळा प्रचंड कडकडाटासह वीज चमकून गेल्याने लोकांमध्ये भीती वाढली. त्याचदरम्यान वादळाने भयंकर रूप धारण करीत पावसाचा जोर वाढवला. साईनाथ नगर परिसरात कृषी उद्योजक अमोल बडे यांच्या बंगल्यात गुडघाभर पाणी शिरले. त्या परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. नाथनगर, शंकरनगर, भगवान नगर, आसरा नगर या पट्ट्यामध्ये पाणी साचण्याचे प्रमाण अधिक होते. भूमिगत गटार योजना कुचकामी ठरल्याने अनेक घरांमध्ये गटारीचे पाणी घुसले. सुधारित नळ योजनेसाठी खोदून ठेवलेले रस्ते ठेकेदारांनी जुजबी माती ढकलून बुजवल्याने सर्व माती पाण्याने वाहून एकही रस्ता चालण्यायोग्य राहिला नाही. साकेगाव, डांगेवाडी, माळी बाभुळगाव, हत्राळ, सैदापूर, तनपुरवाडी या पट्ट्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. साकेगाव परिसरात व शहरातही काही ठिकाणी सोलर प्लेट तीव्र वादळाने उडून इतरत्र पडल्या. शहरातील नदीला पूर आला. प्लास्टिक व अन्य कचऱ्याने संपूर्ण गटार व्यवस्थाच कोलमडून गेल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचून तळे साचले. जुन्या बसस्थानकामध्ये, तर एखाद्या छोट्या बंधाऱ्यासारखे पाणी साचले. अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे. पाणी निचरा होणारी यंत्रणा तकलादू असल्याने पालिकेचे पितळ उघडे पडले. त्यापूर्वीच एकाच पावसाने शहराची त्रेधातिरपीट उडाली. रस्ता खोदताना उघडे पडलेले पेव्हिंग ब्लॉक आता टोकदारपणे वर आल्याने वाहनचालकांना आता कसरत करून वाहने चालवावी लागणार आहेत. ठिकठिकाणी वीजवाहक तारा तुटल्या. नारळाची झाडे, उन्हाळी बाजरी जमीनदोस्त झाली. यंदा आंबा उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. शहरापासून पाच किमी परिघांमधील फ्लेक्स बोर्ड होर्डिंगखाली कोसळून पडले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. चिमण्यांसह अनेक पक्ष्यांचा मृत्यू तालुक्यातील निवडुंगे येथे कडूचंद घोडके यांच्या घरासमोर वीज पडून गोठ्यापुढे बांधलेली म्हैस मरण पावली. यंदा प्रथमच वीज पडून निवडुंगे परिसरात तीव्र आवाज व विजेच्या धक्क्याने चिमण्या व अन्य शेकडो पक्षी मरण पावले. याबद्दल स्थानिकांकडून खूप हळूहळू व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी महसूल यंत्रणेकडून पाऊस वादळ व नुकसानीची माहिती घेतली जात असल्याची माहिती तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी दिली.