फुले मराठा असते तर ठाकरे, शरद पवार रस्त्यावर उतरले असते:ज्योतीबा-सावित्रीबाईंचा अवमान! प्रकाश आंबेडकर यांची टीका

महात्मा ज्योतिराव फुले हे ओबीसी होते. ते जर मराठा असते तर त्यांचा अपमान झाल्यानंतर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा पक्ष रस्त्यावर उतरला असता, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी महा विकास आघाडीवर टीका केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर आधारित चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज आंदोलन देखील करण्यात आले. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, दिल्लीतील एका प्रिंट पत्रकाराने मला फोन करून विचारले की काँग्रेस, शिवसेना (उद्धव) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या अवमानावर गप्प का आहेत. ते म्हणाले, “हे सर्व लोक वंचित बहुजन आघाडीसारखे निषेध का करत नाहीत?” त्यांच्या अगदी योग्य प्रश्नावर मी उत्तर दिले – “कारण महात्मा फुले हे ओबीसी होते. जर ते मराठा असते तर काँग्रेस, शिवसेना (उद्धव) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) रस्त्यावर उतरले असते. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई माळी जातीच्या (उत्तर भारतातील सैनी जातीच्या) होत्या आणि म्हणूनच महाविकास आघाडी त्यांच्या अपमानाचा निषेध करत नाही!” महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन ‘आज नव्याने आलेली गुलामगिरी थोपवायची असेल तर महात्मा फुलेंनी दाखवलेल्या मार्ग शिवाय पर्याय नाही. देशातल्या तमाम वंचित समूहांना ब्राह्मणवाद्यांनी लादलेल्या जातीयवादी व्यवस्थेच्या ‘गुलामगिरी’ची जाणीव करून दिली. म. फुले यांनी फक्त अन्यायाविरुद्ध बंड पुकारले नाही, तर त्याला नवीन पर्यायी व्यवस्था ही दिली. वंचित, शोषित, पीडितांसाठी समतेची दारे उघडली. अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून इथल्या जातिव्यवस्थेवर प्रहार केला. सावित्रीमाईंसोबत त्यांनी शिक्षणाची मशाल पेटवून इथल्या समाजक्रांतीचा पाया रचला. सामाजिक क्रांतीचे प्रणेते, छत्रपती शिवरायांची समाधी शोधून त्यांच्यावर पहिल्यांदा पोवाडा लिहिणारे, सत्यशोधक व क्रांतीकारक राष्ट्रपिता जोतिबा फुले यांना अभिवादन! त्यांच्याच विचारांवर आपल्याला पुढे जातांना समतेची मूल्य अजून बळकट करूया आणि इथल्या शोषित, पीडित, वंचितांचा आवाज बुलंद करूया, हेच महात्मा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन असेल! जय फुले, जय शाहू, जय भीम!!!’