अश्लील व्हिडिओ, काळी जादू आणि गांजा:वैष्णवी हगवणे प्रकरणातील संकेत चौंधे कुटुंबावर देखील गंभीर आरोप; अदखलपात्र गुन्हा दाखल

अश्लील व्हिडिओ, काळी जादू आणि गांजा:वैष्णवी हगवणे प्रकरणातील संकेत चौंधे कुटुंबावर देखील गंभीर आरोप; अदखलपात्र गुन्हा दाखल

वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या संकेत चौंधे यांच्यावर देखील त्यांच्या घरातील महिलेने छळाचे गंभीर आरोप केले आहेत. माझा नवरा सुरेश चौंधे हा अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास देत असल्याचा आरोप त्याच्या बायकोने केला आहे. इतकेच नाही तर आपली सासू काळी जादू करते, असे म्हणत तिने नवरा आणि दीर हे सासू समोरच गांजा पीत असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण समोर आल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार होते. या काळात त्यांनी संकेत नरेश चौंधे यांची गाडी वापरली. दरम्यान चौंधे यांची थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयश याची क्रेटा गाडी देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. मात्र आता त्याला मदत करणाऱ्या संकेत नरेश चौंधे याच्यावर देखील वहिनीचा छळ केल्याचा आरोप आहे. संकेत याचा लहान भाऊ असलेल्या सुरेश चौंधे यांच्या पत्नीचा वीस लाख रुपये हुंड्यासाठी छळ करण्यात आला होता. या छळाला कंटाळून तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता. तसेच पोलिस तसेच महिला आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. चौंधे कुटुंबाकडून आपला छळ होत असल्याच्या महिलेने तक्रार केल्यानंतर बावधन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, चौंधे परिवारातील एकही सदस्याला अद्याप या प्रकरणात अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे हगवणे पिता- पुत्रांसोबतच त्यांच्या संबंधांमध्ये देखील अशाच प्रकारे महिलांचा छळ होतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या चौंधे बंधूंची देखील पोलिस चौकशी करत आहेत. या दरम्यान सुरेश चौंधे यांच्यावर पत्नीच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुरेश चौंधे याला नोटीस देखील बजावली असून त्यांच्या गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment