प्रशांत कोरटकरच्या जामिनावर सुनावणी पूर्ण:कोल्हापूर सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला, कोरटकरला जेल की बेल? उद्या निर्णय

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणात दोन्ही बाजूचा युक्तीवाद पार पडला. युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोल्हापूर सत्र न्यायालयाने निकाल आज राखून ठेवला आहे. प्रशांत कोरटकरच्या जामीनावर न्यायालय उद्या निकाल देणार आहे. आज सुनावणीला प्रशांत कोरटकर याच्याकडून सौरभ घाग, सरकारी वकील विवेक शुक्ल तर इंद्रजीत सावंत यांच्याकडून वकील असिम सरोदे हे उपस्थित होते. दरम्यान, आवाजाचा नमुना नोंद करण्यासाठी मी कोणत्याही वेळी उपलब्ध असेल, असा अर्ज प्रशांत कोरटकरने न्यायालयात दिला आहे. कोर्टात कुणी काय युक्तीवाद केला? आम्ही मोबाईल जमा केलेला आहे, त्यामुळे स्वतः अटक होण्याची कोणती गरज नाही. पोलिसांनी अटक होण्यासाठी सांगितलेली कारणे गंभीर आहेत, असा युक्तीवाद प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी केला. स्वातंत्र्य म्हणजे सोयराचार नाही, त्यामुळे बोलण्याच्या स्वातंत्र्याचा गैरउपयोग प्रशांत कोरटकरने केला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे आणि अशी वक्तव्ये आणखी कुणी करू नये, यासाठी प्रशांत कोरटकरची अटक गरजेची आहे, असा युक्तीवाद सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी केला. दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी असे वक्तव्य केल्याचे दिसतंय. मोबाईल देखील फॉरमॅट करून जमा केला आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल असेल, तर मग कोरटकरने आपला अर्ज नागपूर न्यायालयात का दाखल केला? या सर्व बाबींवरून प्रशांत कोरटकरकडून न्यायालयाची दिशाभूल सुरू आहे, असा युक्तीवाद इंद्रजीत सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनी केला. अॅड. असिम सरोदे नेमके काय म्हणाले? सुनावणी पार पडल्यानंतर इंद्रजीत सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणात आम्ही प्रशांत कोरटकर आणि इंद्रजीत सावंत यांच्यातील संभाषण कोर्टात वाचून दाखवले. संभाषणात बऱ्याच ठिकाणी कोरटकर यांनी घाण आणि वाईट शिव्या दिल्या असल्याकारणाने ते वाचून दाखवले नाही. न्यायाधीश ते वाचतील. या प्रकरणाला राजकीय संदर्भ प्रशांत कोरटकर यांना स्पष्टपणे कोणत्याही प्रकारे चर्चा करायची नाही. आपले गैरसमज सांगायचे नाही किंवा इंद्रजीत सावंत यांनी काही चुकीचे बोलले आहे, त्याच्याबद्दल चर्चा करून शंका निरसन करून घ्यायचे नाही. केवळ आपलेच म्हणणे बरोबर आहे, असे समजून एक ब्राह्मणवाद आणण्याचा प्रयत्न कोरटकर करत आहेत. ब्राह्मण आणि मराठा यांच्यात नसलेले एक भांडण उकरून काढण्याचा राजकीय संदर्भ सुद्धा या प्रकरणाला आहे. ते सुद्धा आम्ही सांगितले. प्रशांत कोरटकर सारखी व्यक्ती एक प्रकारची प्रवृत्ती आहे. त्यामुळे ही लढाई त्यांच्याविरुद्धव नाही. जामिनाचा अर्ज यासाठी महत्त्वाचा आहे की, अशा प्रवृत्तीचे लोक मग ते ब्राह्मणवादी असो किंवा कट्टरवादी समाजाचे असो, ते असणे चुकीचे आहे. संविधानासाठी ते धोकादायक आहे, असे वकील सरोदे म्हणाले. प्रशांत कोरटकर पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात प्रशांत कोरटकर यांची सगळी वागणूक आपण पाहिली. त्या वागणुकीतून दिसतंय की, त्यांना कायद्याचा कोणताही आदर नाही. कायद्याच्या कचाट्यातून पळून जाण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांनी मोबाईल जरी जमा केला असेल, तरी त्यातील सगळा डेटा नष्ट केला आहे. मोबाईलमध्ये आणखी काही गोष्टी होत्या का? या तपासण्यासाठी प्रशांत कोरटकर यांनी कोणताही वाव ठेवलेला नाही. ते या प्रकरणात शातीर बदमाशाप्रमाणे वागलेले आहेत. प्रशांत कोरटकर हे काही अत्यंत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. कोल्हापूरातील पोलिस अधिकाऱ्यांच्याही संपर्कात ते आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधील डेटा डिलीट करणे, सगळा मोबाईल साफ करून मग तो जमा करणे, अशा प्रकारचे काम करत आहेत. प्रशांत कोरटकरला जामीन मिळायला नको प्रशांत कोरटकर यांचा उद्देश चांगला होता, तर मग त्यांना एवढा राग कोणत्या व्हिडिओचा आला, ज्यामध्ये इंद्रजीत सावंत यांनी ब्राह्मणद्वेषी वक्तव्य केलेले आहे. इंद्रजीत सावंत यांनी ब्राह्मणद्वेषी किंवा ब्राह्मणविरोधी कोणतेही वक्तव्य केले असेल, तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. परंतु, त्यांनी असे काही केलेलेच नाही. त्यामुळे प्रशांत कोरटकर यांना कोणत्या व्हिडिओचा राग आला, ते त्यांना अटक केल्याशिवाय कळणार नाही. प्रशांत कोरटकर कायद्याला कोणतेही सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांना जामीन मिळायला नको, असा युक्तीवाद आम्ही केला आहे. त्यावर न्यायालय उद्या निर्णय देईल, असे वकील असिम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. नेमके प्रकरण काय? छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. सावंत यांनी स्वतः या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राxx धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत. पण या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी किती विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून मी ही रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे, असे सावंत यांनी म्हटले होते. इंद्रजित सावंत यांनी छावा चित्रपटाविषयी माध्यमांशी संवाद साधताना कथितपणे ब्राह्मणद्वेषी विचार मांडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्रशांत कोरटकर नामक नागपूरच्या व्यक्तीने फोन करून त्यांना धमकी दिली आहे. इंद्रजीत सावंत यांनी स्वतः यासंबंधीची ऑडिओ क्लिप जाहीर करत तसा दावा केला आहे. त्यानंतर या प्ररकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.