प्रशांत कोरटकरविरोधात लुकआउट नोटीस जारी:पोलिसांनी पासपोर्टही केला जप्त; लुकआउट नोटीस म्हणजे काय? जाणून घ्या

प्रशांत कोरटकरविरोधात लुकआउट नोटीस जारी:पोलिसांनी पासपोर्टही केला जप्त; लुकआउट नोटीस म्हणजे काय? जाणून घ्या

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटरकविराधोत कोल्हापूर पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली आहे. यामुळे प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरचा पासपोर्टही जप्त केला आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर बाहेर देशात पळून जाण्याची शक्यता कमी आहे. 18 मार्च 2024 रोजी सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. तेव्हापासून तो फरार आहे. त्याच्या शोधकामी पोलिसांची पथके नागपूर, चंद्रपूर आणि मुंबई या तीन ठिकाणी तपास करत आहेत. मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही. अखेर कोल्हापूर पोलिसांकडून आज प्रशांत कोरटकर विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच कोरटकरने कुठे-कुठे विमान प्रवास केला, याबाबत ब्युरो ऑफ इम्रिगेशन यांच्याकडून माहिती घेतली जाणार आहे. लूकआऊट नोटीस म्हणजे काय? लूकआऊट नोटीस हे भारतातील अधिकाऱ्यांद्वारे वापरले जाणारे एक परिपत्रक आहे जे प्रवासी व्यक्ती पोलिसांना हवा आहे की नाही हे तपासण्यासाठी वापरले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा समुद्री बंदरांसारख्या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी याचा वापर केला जातो. जेव्हा एखादा गुन्हेगार अटक टाळण्यासाठी फरार होतो, तेव्हा लूकआऊट नोटीस जारी केली जाते. लूकआऊट नोटीसला लूकआऊट सर्क्युलर असेही म्हणतात. कधीकधी, कायदा अंमलबजावणी संस्था ज्यांच्यासाठी विनंती करतात त्यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटिस जारी केल्या जातात. भारतात लूकआऊट नोटीस गृह मंत्रालयाने जारी केलेल्या काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून जारी केली जाते. लूकआऊट नोटीस कोण जारी करू शकते? कोणत्याही आरोपीविरुद्ध (भारतीय किंवा परदेशी) लूकआऊट नोटीस म्हणजेच एलओसी जारी केली जाऊ शकते. जर एखादा गुन्हेगार जाणूनबुजून अटक टाळत असेल किंवा न्यायालयात हजर राहण्यास नकार देत असेल, तर त्याच्याविरुद्धही लूकआऊट नोटीस बजावली जाऊ शकते. न्यायालये, सीबीआय, ईडी, एसएफआयओ आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह १५ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही नोटीस जारी केली जाऊ शकते. कोरटकरच्या लूकआऊट नोटीसवर अॅड सरोदेंची प्रतिक्रिया प्रशांत कोरटकर विरोधात लूकआऊट नोटीस जारी केल्यानंतर इंद्रजीत सावंत यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत कोरटकरांविरोधात लूकआऊट नोटीस काढण्याची वेळ सरकारवर येणे ही फार मोठी घडामोड असल्याचे असीम सरोदे म्हणाले. वरिष्ठ पातळीवरून सुद्धा या प्रकरणात लोकांनी लक्ष घातल्याचे दिसतंय. लूकआऊट नोटीस काढली याचा अर्थ प्रशांत कोरटकरच्या बॉर्डर हालचालींवर आता मर्यादा आल्या आहेत. ते भारतामध्ये असतील तर त्यांना आता भारताच्या बाहेर जाता येणार नाही, असे अॅड. असिम सरोदे यांनी म्हटले आहे. जर प्रशांत कोरटकर दुबईला गेले असतील तर ही गोष्ट महाराष्ट्र पोलिसांसाठी लांच्छनास्पद असल्याचेही ते म्हणाले. चिल्लर माणसाला पकडू न शकणारे पोलिस अकार्यक्षम कोरटकर प्रकरणाला महिना होऊनही त्यांना कोणी अटक करू शकले नाही. फडणवीस म्हणाले की, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. चिल्लर माणसाला न पकडू शकणारे पोलिस अधिकारी हे अकार्यक्षमच असू शकतात, असे महाराष्ट्रातील लोकांचे मत झाले आहे, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही चांगली परिस्थिती नाही, असा घणाघात सरोदे यांनी केला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment