पंतप्रधानांनी प्रभू श्रीरामाला स्मरून सांगावे ईव्हीएममध्ये घोटाळा नाही:अभिजीत बिचुकलेंचे थेट मोदींना आव्हान, शरद पवारांना दिला पाठिंबा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि महायुती प्रचंड बहुमताने सत्तेवर आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे उपमुख्यमंत्री पदावर नियुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यात आता अभिजीत बिचुकले यांनी उडी घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे. अभिजीत बिचुकले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्रीरामाला स्मरून सांगावे की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही, असे म्हणत बिचुकले यांनी थेट मोदींना आव्हान दिले आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोरून येऊन सांगावे की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नाही. शरद पवार साहेबांचा एवढा दारुण पराभव महाराष्ट्रात होऊ शकत नाही, असेही बिचुकले म्हणाले आहेत. पुढे अभिजीत बिचुकले म्हणाले, शरद पवार यावर ठोस पाऊले उचलावे. मी पवार साहेबांच्या मागे उभा आहे. शरद पवारांना ईव्हीएम विरोधात आंदोलनासाठी माझा पाठिंबा आहे. यासाठी पवार साहेब धाडसी पाऊल उचलावे, मी पवार साहेबांचा पाठीराख म्हणून मागे उभा राहील, असे बिचुकले यांनी म्हंटले आहे. अभिजीत बिचुकले म्हणाले, बारामतीमध्ये मला 200 मते पडायला हवी होती, पण मला केवल 92 मतेच कशी मिळाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्याला खऱ्या अर्थाने स्टारडम मइ दिले आहे. लोक माझ्यासोबत फोटो काढायला गर्दी करतात मग माझी मते जातात कुठे, असेही बिचुकले यावेळी म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मतांच्या आकडेवारीवर शंका उपस्थित केली आहे. तसेच शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी सादर करत निवडणूक आयोग तसेच महायुती सरकारवर सवाल उपस्थित केला आहे. कॉंग्रेसला 80 लाख मते पडली पण त्यांचे 16 च आमदार निवडून आले. शिवसेना शिंदे गटाला 79 लाख म्हणजे कॉंग्रेस पेक्षा एक लाख मते कमी पडली तरई त्यांचे 57 आमदार निवडून आले, अशी शंका शरद पवारांनी उपस्थित केला आहे.