पृथ्वीराजचा बेसावधपणा:सोलापूरच्या वेताळ शेळकेने 66वी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा आपल्या नावे केली

कर्जतच्या संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत मुंबई उपनगरच्या पृथ्वीराज पाटीलचा अंतिम सामन्यातील बेसावधपणा अंगलट आला अन् सोलापूरच्या वेताळ शेळकेने ६६ वी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा आपल्या नावे केली. वेताळ पृथ्वीराजला ७-१ गुणाने पराभूत करत नवा महाराष्ट्र केसरी बनला. तत्पूर्वी, पृथ्वीराजने दावेदार नांदेडच्या शिवराज राक्षेचा धक्कादायक पराभव करत केसरीच्या लढतीत प्रवेश केला होता. अंतिम लढतीत वेताळ शेळकेने आक्रमक खेळ करत सामन्यात वर्चस्व राखले. प्रतिस्पर्धी पृथ्वीराज पाटीलने संथ व बेसावाध खेळ केल्याने त्याला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले. वेताळला माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देण्यात आली. वेताळच्या घरी टीव्ही नाही, शेजाऱ्यांकडे पाहिला सामना बेंबळे (ता. माढा)| बेंबळेतील अतिशय गरीब, अल्पभूधारक कुटुंबात जन्मलेला वेताळ औदुंबर शेळके मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ६६ वा महाराष्ट्र केसरी ठरला. वेताळ शेळके हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बेंबळे गावचा (ता. माढा) शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. आजोबा, वडील व चुलते अशी कुटुंबात पहिलवानांची परंपरा राहिली. आई-वडिलांनी मोलमजुरी करून वेताळला पहिलवान बनवले. अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थितीत वेताळने आपल्या आई-वडिलांचे नाव देशभरात उंचावले. स्वत:च्या घरात टीव्ही नसल्याने महाराष्ट्र केसरीची लढत सुरू असताना आई आणि भाऊ शेजाऱ्याच्या घरात टीव्ही पाहत बसले होते. वेताळने विजय मिळवताच आई भावुक झाली, तिच्या डोळ्यातून आश्रू आले.