पब्लिसिटीसाठी महापुरुषांबाबत बोलणे योग्य नाही:उपमुख्यमंत्र्यांनंतर राधाकृष्ण विखे पाटीलही नितेश राणेंच्या वक्तव्याने नाराज

केवळ स्वत:च्या प्रसिद्धीसाठी देशातील महापुरुष यांच्याबाबत बोलणे योग्य नाही. देशातील महापुरुषांवर केलेल्या कोणत्याही विधानाचे कोणीही समर्थन करू शकत नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. मंत्री नितेश राणे यांना अजित पवार यांनी समज दिल्यानंतर यावर आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येत आहेत. महापुरुषांवर विनाकारण बोलण्याची आवश्यकता नसल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. व्यक्ती कोणत्याही पक्षातला असो, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी बोलतात काळजी घ्यायला हवी. तसेच अशा वक्तव्ये न करण्याचा सल्ला अजित पवार यांनी नितेश राणे यांना दिला होता. या माध्यमातून नितेश राणे यांना समज देण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला होता. या संबंधीत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्या वक्तव्याचे मी समर्थनच करतो. आमच्या महापुरुषांवर कोणी टिप्णी करत असेल, तर त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. आमचे महापुरुषांची एक गरिमा आहे, त्यांची गरिमा आणि पावित्र जपले पाहिजे. त्यामुळे अजित पवार जे बोलले ते एकदम योग्य आहे. केवळ पब्लिसिटीसाठी जे लोक बोलतात, ते देखील स्वतःची प्रतिमा मलीन करत असल्याचा त्यांनी विचार करायला हवा, असे देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. नेमके राणेंचे वक्तव्य काय? नीतेश राणे म्हणाले होते की, औरंगजेबची कबर उखडून काढू. सरकारने काढली नाही, तर आम्ही काढू. कबर काढण्यासाठी लाँग मार्च काढू. आम्ही हिंदू म्हणून व्यासपीठावर एकत्र आहोत. कसबा शास्त्रीपूल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समितीच्या वतीने संभाजी महाराज धर्मरक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री नीतेश राणे बोलत होते. नीतेश राणे म्हणाले की, आमच्यातील काही कारटे सांगतात की शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम होते, कोण मुसलमान शिवरायांच्या सैन्यात नव्हते. ही लोकं उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू-विरुद्ध मुसलमान होती. औरंग्याची निशाणी नष्ट केली आहे, आता कबरही उखडून काढू. तर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे असे स्मारक उभारू की, जगभरातील सर्वजण या ठिकाणी येऊन नतमस्तक होतील, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेबाची कबर उखडण्यासाठी तारीख किंवा वेळ घोषित केली जाणार नाही, लॉंग मार्च काढू. आपल्या नावापुढे जी हिंदू नावे दिसत आहे ही फक्त धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामुळेच लागली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून समज देण्याचा प्रयत्न मंत्री नीतेश राणे यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत त्यांची कानउघाडणी केली. ते म्हणाले की, दोन्हीही बाजूच्या सन्मानीय सदस्यांनी कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ज्यांचे देशावर प्रेम आहे, असा मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात भारतात आणि महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवरायांच्यासोबत मुस्लीम लोकही होते. त्यांचा दारूगोळा कोण सांभाळत होते? किती तरी उदाहरणे आपल्याला देता येतील. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य का केले, त्यांच्या वक्तव्यामागील हेतू काय होता, तो मला माहिती नाही. आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो-जो मुस्लीम घटक आहे, तो देशप्रेमीच आहे.