पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार नाही:अजित पवार यांचे थेट भाष्य; घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरण्याचे आवाहन

विधानसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारच्या वतीने तशी कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात तरी शेतकऱ्यांना तसा दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अर्थसंकल्पात देखील शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आली नाही. याविषयी आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर याच वर्षी काय? पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे त्यांनी थेटच सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिक कर्जाचे पैसे 31 तारखेच्या आज भरण्याचे आवाहन देखील उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे. बारामती मधील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड याठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे नूतनीकरण, अनावरण समारंभ आणि शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शक करताना ते बोलत होते. या वेळी अजित पवार म्हणाले की, आजच्या आर्थिक परिस्थितीनुसार आम्ही पुढचे निर्णय घेत आहोत. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे या वर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा, असे आवाहन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे. मात्र, शून्य टक्के व्याज दराने तुम्हाला कर्ज मिळावे, यासाठी बँकेला जे पैसे भरावे लागतात. ती सर्व रक्कम म्हणजेच हजार ते बाराशे कोटी रुपये बँकेला देण्यात आले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. हा पैसा मी एकट्याने नव्हे तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी आम्ही तिघांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी सांगितले की, सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास 65 हजार कोटी रुपये वीज माफी देण्यात आली आहे. तुम्हाला जरी माफी दिसत असली तरी त्याचे पैसे सरकार महावितरण भरत असते. तसेच लाडक्या बहिणीसाठी देखील अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद करावी लागली आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. इतकेच नाही तर राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वांचे पगार आणि निवृत्तीवेतन आणि घेतलेल्या कर्जाचे व्याज, याला साडेतीन लाख कोटी रुपये आणि हे 65 हजार कोटी असे चार लाख पंधरा हजार कोटी तर यात जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. 40 दिवसाचे सात रुपयांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा दुधावर राज्य सरकारच्या वतीने दिले जाणारे अनुदान देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असेल. ते जमा झाले नसेल तर ते लवकर जमा होतील, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. 40 दिवसाचे सात रुपयांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. ज्यांचे पैसे जमा झाले नसतील तर ते देखील पैसे लवकर जमा करणार असल्याचे अजित पवार यांनीच म्हटले आहे.