पुण्यात वाल्मीक कराडने घेतले महिलेच्या नावावर आलिशान ऑफिस:कोण आहे ही महिला? काय आहे त्यांचा संबंध? चर्चेला उधाण
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी व मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून परळी येथे कराड कुटुंब तसेच कराड समर्थकांनी आंदोलन सुरू केले आहे. या सगळ्यात आता वाल्मीक कराडचे नावावर पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर एका इमारतीमध्ये देखील ऑफिस असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. तसेच वाल्मीक कराडने ही गुंतवणूक एका महिलेच्या नावावर केल्याचे उघड झाले आहे. वाल्मीक कराडने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका इमारतीत ऑफिससाठी जागा घेतल्याचे समोर आले आहे. ही गुंतवणूक वाल्मीकने एका महिलेच्या नावावर केल्याचे उघड झाले असून या महिलेचे नाव ज्योती जाधव असे आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवर कुशल वॉल स्ट्रीट या इयमरातीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी काम सुरू होतानाच वाल्मीक कराडने इथे गुंतवणूक केली. या इमारतीत ऑफिस नंबर 610 सी हे अपार्टमेंट असून त्यात 45.71 चौ.मी कार्पेट एरिया एवढ्या जागेचे आलिशान ऑफिस घेतले आहे. विशेष म्हणजे या ऑफिसला बाल्कनी असून पार्किंगसाठी देखील जागा देण्यात आली आहे. वाल्मीकचे दुसरे ऑफिस नंबर 611 बी या अपार्टमेंटमध्ये असून त्याचे कार्पेट एरिया 54.51 चौ.मी एवढे आहे. यात देखील बलकिन तसेच पार्किंगची सुविधा आहे. हा एकूण 25 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की या महिलेचा वाल्मीक कराडशी काय संबंध आहे? या प्रकरणात ईडीकडून चौकशी होऊ शकते. दरम्यान, बीड जिल्ह्यातील आता परळी देखील चांगलेच पेटले असल्याचे दिसत आहे. या पूर्वीपर्यंत देशमुख कुटुंबाकडून मोर्चे काढण्यात येत होते, त्यात आता वाल्मीक कराडच्या कुटुंबाने आंदोलन सुरू केले आहे. वाल्मीक कराडची आई देखील यात सहभागी असून जोपर्यंत त्याच्यावरील गुन्हा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा कराड कुटुंबाकडून देण्यात आला आहे. त्यात परळी येथील जनतेने देखील या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. परळी येथील बाजारपेठ सुद्धा बंद करण्यात आले आहेत. सर्वत्र शुकशुकाट दिसत असून मोठ्या संख्येने येथील व्यापारी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे.