पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा:गर्भवतीच्या उपचारासाठी मागितले 10 लाख, भाजप आमदाराच्या PA च्या पत्नीचा मृत्यू

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा:गर्भवतीच्या उपचारासाठी मागितले 10 लाख, भाजप आमदाराच्या PA च्या पत्नीचा मृत्यू

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला रुग्णापेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. येथील प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. दोन गोंडस जुळ्या बाळांना जन्म देऊन या आईचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच नामांकित अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, तनिषा भिसे यांना प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्यावर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. तेव्हा जवळ सध्या दोन लाख रुपये आहेत, तेवढे घेऊन उपचार सुरू करण्याची विनंती कुटुंबीयांनी केली. मात्र तरी देखील महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतले नाही. त्यानंतर गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दोन जुळ्या मुलांना जन्म देऊन महिलेने श्वास सोडला गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना महिलेला त्रास झाला आणि दोन जुळ्या बाळांना जन्म देऊन महिलेने श्वास सोडला. या घटनेने भिसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे या महिलेला जीव गमवावा लागला, असा आरोप केला जात आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी आम्ही रुग्णालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. महिलेचे पती भाजप आमदार अमित गोरखे यांचे PA दरम्यान, मृत महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोर कारभाराची माहिती सुशांत भिसे यांनी कळवली असता तेव्हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरी देखील रुग्णालय प्रशासनाने त्यांचे ऐकले नाही. याचा परिणाम म्हणजे गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला. या घटनेची आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचे समजते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची असंवेदनशीलता- सुषमा अंधारे या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर करत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीका करताना म्हटले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत असंवेदनशीलतेमुळे स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत आणि यासाठी म्हणजे तनिषा भिसे यांना रुग्णालयात भरती करून घ्यावे यासाठी मंत्रालयातून फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयला जराही पाझर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसुतीच्या वेदनेने विव्हळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही. इतका उद्दामपणा, इतका निर्ढावलेपण तेव्हाच येऊ शकते जेव्हा सत्ताधाऱ्यांचे राजछत्र भक्कम पाठीशी असते, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल असंख्य तक्रारी येऊन सुद्धा दिमाखात उभे आहे. रुग्णालयाला मिळणारी जागा, मिळणारी प्रीव्हीलेज सत्ताधाऱ्यांमुळे आहे हे वेगळे सांगायला नको. परंतु प्रश्न हा उरतो की सत्ताधारी आमदाराच्या निकटवर्तीयाच्या जिवावर बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्या-मुंग्यासारखे चिरडून टाकायलाही मागेपुढे बघणार नाही. मुख्यमंत्री आणि प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई करावी – आमदार अमित गोरखे या घटनेवर भाजप आमदार अमित गोरखे म्हणाले, आज एका धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेमुळे मी अत्यंत व्यथित आहे. माझे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी यांना प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे नेले असता रुग्णालयाने 10 लाख रुपये भरण्यास सांगितले. 3 लाख रुपये भरण्याची तयारी असताना ही प्रवेश नाकारला. त्यानंतर मंत्रालयाकडून संपर्क होऊनही हॉस्पिटलच्या प्रशासनाने निर्णय झुगारला. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने दुसऱ्या हॉस्पिटलला जावे लागले. तिथे उपचारानंतर दोन जुळ्या मुलींचा जन्म झाला, पण दुर्दैवाने त्या मातेचा मृत्यू झाला. पुढे बोलताना अमित गोरखे म्हणाले, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल गरिबांसाठी एक ट्रस्ट म्हणून ओळखले जाते. मात्र इथेच अशा प्रकारे उपचार नाकारले जातात, हे अत्यंत संतापजनक आहे. अशा अनेक तक्रारी या हॉस्पिटलच्या विरुद्ध आल्या आहेत. या अन्यायाविरोधात मी येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे. तसेच मुख्यमंत्री आणि प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment