पुण्यातील नाना पेठेतील लाकडी वाड्याला भीषण आग:अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

पुण्यातील नाना पेठ येथील राम मंदिराशेजारील लाकडी वाड्याला भीषण आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या एक तासापासून अग्निशमन दलाच्या जवनांकडून ही आग विझवण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या गर्दीमुळे कारवाईला काहीशी अडचण देखील निर्माण झाली असल्याचे समजते. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. नाना पेठ येथे असलेल्या या जुन्या लाकडी वाड्याला रात्री 8 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्राला माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आगीने रौद्रयारूप धारण केले होते. गांभीर्य लक्षात घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्यास सुरू केली व आणखी मदत मागवली. 10 फायर टेंडर आणि चार पाण्याच्या टँकरच्या मदतीने वाड्याच्या चारही बाजूने पाण्याचा मारा अग्निशमन दलाने सुरू केला व एक तासाच्या अथक प्रयातनानंतर आग नियंत्रणात यश आले. दरम्यान, रामनवमीच्या निमित्ताने येथील राम मंदिरात देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तसेच रस्त्यावर देखील वर्दळ होती. यात येथील जुन्या लाकडी वाड्याला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.