‘पुष्पा, कुलरचा शॉक, वीज चोरी’वर पथनाट्य, महावितरणकडून आयोजित चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्यापूर उपविभागात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुष्पा, कुलरचा शॉक आणि वीज चोरी या पथनाट्याच्या माध्यमातून विद्युत अपघात, त्याचे परिणाम आणि निर्माण होणारी कौटुंबिक परिस्थितीची जाणीव करून देत विद्युत ग्राहकांना सर्वप्रथम विद्युत सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. या माध्यमातून विद्युत सुरक्षेविषयी जागर करण्यात आला आहे. मागील काही वर्षात महावितरण कर्मचाऱ्यांचे अपघात कमी करण्याला महावितरणला यश आले आहे. परंतू जनतेचे तसेच विशेषत: लहान मुलांचे विद्युत शॉक लागून अपघात होऊ नये, यासाठी महावितरण कंपनीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यात वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी चित्रकला स्पर्धा, पथनाट्य आणि २३ उपविभागात बाजाराच्या तसेच गर्दीच्या परिसरात विद्युत सुरक्षेचा जागर करण्यात येत आहे. अचलपूरचे कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांच्या मार्गदर्शनात दर्यापूर उपविभागात हे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच धारणी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बिजूधावडी ग्रा. पं.च्या आवारात ग्रामस्थांना विद्युत सुरक्षेबद्दल माहिती देत गाव अपघात शून्य करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे विजयकुमार कासट यांच्या पुढाकारातून मोर्शी विभागांतर्गत शेंदुरजना घाट शहर, जरुड, हातुर्णा आणि गाडेगाव येथे वीज ग्राहकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागर करण्यात आला. कार्यकारी अभियंता अमरावती शहर राजेश घाटोळे यांच्या मार्गदर्शनात अमरावती शहराअंतर्गत विशेषत: एमआयडीसी आणि उपविभाग १ आणि २ मध्ये वीज ग्राहकांना विद्युत सुरक्षेची माहिती देण्यात आली. अमरावती ग्रामीण विभागातही कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे यांच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वीज ग्राहकांना वीज अपघात कसे टाळावे याबाबत माहिती देण्यात आली. ४८ चिमुकल्यांनी स्पर्धेमध्ये रेखाटले चित्र महावितरणच्या चांदूर बाजार उपविभागाद्वारे आयोजित केलेल्या विद्युत सुरक्षा चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जवळा उपकेंद्र परिसरात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ४८ मुलांनी सहभाग नोंदवला.