रागाच्या भरात भावानेच सात वर्षीय बहिणीची केली हत्या:किरकोळ वादातून पक्कडने केला वार, वसईतील घटनेने एकच खळबळ

रागाच्या भरात भावानेच सात वर्षीय बहिणीची केली हत्या:किरकोळ वादातून पक्कडने केला वार, वसईतील घटनेने एकच खळबळ

वसई येथे गुरुवारी एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू सुरुवातीला अपघातामुळे झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता याला वेगळे वळण लागले असून धक्कादायक उघडकीस आली आहे. सात वर्षांच्या अंजली मिथुन शर्मा या चिमुकलीचा मृत्यू अपघात नसून तिच्याच 12 वर्षीय भावाने तिची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. क्षुल्लक वादातून हा खून झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश कुराडे यांनी दिली आहे. गुरुवारी, दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास वसई पूर्व येथील पेल्हार परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. यावेळी अंजली घरी एकटीच होती. तिचे आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी अंजलीचा भाऊ बाहेर खेळत होता, अशी माहिती सुरुवातीच्या तपासात देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी कसून चौकशी करत प्रकरण उघडकीस आणले आहे. सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, अंजलीने स्वयंपाकघरातील ओट्यावर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टूलवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टूलवरून घसरून ती खाली पडली आणि मानेजवळचा भाग किशनच्या पक्कडवर आपटला व यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना घडली तेव्हा घरात आई वडील नव्हते. शेजाऱ्यांनी तत्काळ अंजलीला वसई विरार महानगरपालिकेचे तुळिंज रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच अंजलीला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर वसई विरार गुन्हे शाखेने तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी अंजलीच्या 12 वर्षीय भावाची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. किरकोळ वादातून चिडून त्यानेच आपल्या बहिणीला पक्कडने मारल्याचे त्याने कबूल केले आहे. या प्रकरणात मुलावर बालन्याय प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पेल्हार पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा विभागातर्फे या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment