रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्राकडे:लंडनच्या लिलावात राज्य सरकारने 47.15 लाख रुपयांत खरेदी केली, काय आहे तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व?

लंडनच्या सोथेबी येथे लिलावासाठी ठेवलेली नागपूरचे सेनापती श्रीमंत रघुजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनाने खरेदी केली आहे. या तलवारीसाठी हातळणी, वाहतूक व विमा खर्चासह सुमारे ४७.१५ लाख रुपये खर्च होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांना दूतावास संपर्काची जबाबदारी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शेलार यांनी मध्यस्थामार्फत लिलावात सहभाग घेतला. ही तलवार मराठा शैलीच्या ‘फिरंग’ पद्धतीचा उत्कृष्ट नमुना आहे. तलवारीला सरळ व एकधारी पाते आहे. सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ आहे. पाते युरोपीय बनावटीचे असून त्यावर कंपनीचे नाव कोरलेले आहे. पात्याच्या पाठीवर ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ असा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे. १८१७ मध्ये सीताबर्डी येथे नागपूरकर भोसले आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात लढाई झाली. या लढाईत कंपनीचा विजय झाल्यानंतर भोसल्यांच्या खजिन्याची लूट करण्यात आली. त्यामध्ये अनेक मौल्यवान वस्तू, दागिने आणि शस्त्रे होती. तज्ज्ञांच्या मते ही तलवार त्याच लुटीत किंवा नंतर ब्रिटिशांना दिलेल्या भेटींमध्ये देशाबाहेर गेली असावी. तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व रघुजी भोसले पहिले (1695 – 14 फेब्रुवारी 1755) हे नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील एक कर्तबगार मराठा सरदार होते. त्यांच्या शौर्य, युद्धकौशल्य आणि नेतृत्वगुणांमुळे छत्रपती शाहूंनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही प्रतिष्ठित पदवी बहाल केली. रघुजी भोसले यांनी 1745 आणि 1755 साली बंगालच्या नवाबावर यशस्वी मोहिमा राबवून मराठा साम्राज्याचा विस्तार बंगाल आणि ओडिशापर्यंत केला. याशिवाय, त्यांनी चांदा, छत्तीसगढ आणि संबळपूर या प्रदेशांवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दक्षिण भारतात त्यांनी कुड्डाप्पा व कर्नूल येथील नवाबांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा प्रभाव दक्षिणेकडेही वाढवला. अठराव्या शतकातील धाडसी आणि कुशल सेनानी म्हणून रघुजी भोसले यांना ओळखले जाते. नागपूरकर भोसले यांच्या राज्यात लोखंड, तांबे यांसारख्या खनिजसंपत्तीचे भरपूर भांडार होते. या धातूंचा उपयोग केवळ वस्तू निर्मितीतच नव्हे तर शस्त्रास्त्रांच्या उत्पादनातही केला जाई. नागपूरकर भोसले घराण्याच्या राजशस्त्रांमध्ये सामर्थ्य आणि सौंदर्य यांचा उत्तम संगम दिसून येतो.