राहुल गांधींना काळे फासण्याची भाषा:ठाकरेंच्या नेत्याविरोधात काँग्रेस आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा देणारे उद्धव ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांचे विरोधात आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली असून दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या संदर्भात बाळा दराडे म्हणाले होते की, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीमध्ये राहतो. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. मात्र, राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करत असल्याचे बाळा दराडे यांनी म्हटले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत राहुल गांधी यांना सुनावले आहे. सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू. आम्ही महा विकास आघाडीमध्ये असलो तरी महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, असेही बाळा दराडे यांनी म्हटले होते. अशा धमक्यांना काँग्रेस भीक घालत नाही – हर्षवर्धन सपकाळ बाळा दराडे यांच्या या भूमिकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील कडाडून विरोध केला आहे. अशा धमक्या सहन केल्या जाणार नसल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. मात्र या सर्व प्रकरणामुळे आता महा विकास आघाडीमध्ये चांगलाच वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. त्याला उत्तर देण्यास आमचे कार्यकर्ते देखील पुरेसे असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांना तुम्ही हात लावून दाखवा – यशोमती ठाकूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता महानगरपालिकांच्या निवडणुका असल्याने सदरील राजकारण केले जात असल्याचे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. मात्र राहुल गांधी यांना अशा शब्दात बोलणे कोणीही खपवून घेणार नाही. राहुल गांधी यांना तुम्ही हात लावून दाखवा, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.