मुख्यमंत्र्यांनी विधानसभा सभागृहात दिशाभूल केली:सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी राहुल गांधींचा आरोप; नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला की सोमनाथ सूर्यवंशी हे दलित असल्याने त्यांची हत्या करण्यात आली आहे, तसेच पोलिस खाते हे गृहविभागाच्या अंतर्गत येत असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर काय म्हणाले राहुल गांधी? सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर राहुल गांधी म्हणाले, मी आज सोमवंशी कुटुंबीयांची भेट घेतली, ज्यांना मारहाण झाली त्यांचीही भेट घेतली. मला त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट्स दाखवले, व्हिडिओ दाखवले, त्यावरुन हा शंभर टक्के न्यायालयीन मृत्यू आहे, पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात पोलिसांना मेसेज देण्यासाठी खोटे बोलले असल्याचे देखील यावेळी राहुल गांधी म्हणाले. पुढे राहुल गांधी म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी हे दलित आहेत, ते संविधानाचे रक्षण करत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. ज्या लोकांनी हे केले आहे त्यांना शिक्षा व्हावी, अद्यापपर्यंतच्या कारवाईवर मी संतुष्ट नाही. हे कुठलेही राजकारण नाही, असे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. एकंदरीतच राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल चढवल्याचे दिसले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिशाभूल केली – नाना पटोले मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सोमनाथ सूर्यवंशी यांना दम्याचा आजार होता त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण मुख्यमंत्री खोटे बोलले आहेत. विधानसभेत त्यांनी दिशाभूल केली. त्यामुळे कॉंग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आम्ही प्रिविलेज मोशन आणू, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटले आहे. पुढे नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध हक्कभंग आणणार. इथे भेट घेतल्यानंतर राहुल गांधी लोकसभेत सुद्धा भूमिका मांडतील आणि सरकारचे पितळ उघड करतील. ज्या पद्धतीने ठरवून मागासवर्गीयांना आणि बौद्धांना व अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्याचे काम भाजप करत आहेम ते या ठिकाणी दिसले आहे. या सर्व गोष्टीचा आवाज लोकशाही पद्धतीने कॉंग्रेस प्रत्येक ठिकाणी उचलेल, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी काय म्हणाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? विधानसभा सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सूर्यवंशी यांना दोन वेळा न्यायाधीशासमोर उभे करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी मारहाण केली का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी पोलिसांनी मारहाण केली नसलयाचे सांगितलं आहे. तसेच ते पोलिस कोठडीत असतानाचे सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत. असा दावा देखील फडणवीस यांनी केला. वास्तविक सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार आहे. त्याचा उल्लेख त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये लिहिलेला असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या जुन्या जखमांचा देखील उल्लेख पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. सूर्यवंशी यांना पोलिस कोठडीतून ज्यावेळी न्यायालयीन कोठडीत नेले गेले, त्यावेळी त्यांना जळजळ होत होती. तशी तक्रार सहकारी कैद्याने केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील घडलेल्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन दिले होते. तसेच या प्रकरात मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारच्या वतीने केली जाणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती. मात्र, एखाद्या प्ररकणावर शंका उपस्थित होत असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी. म्हणूनच या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाणार असल्याची घोषणा देखील फडणवीस यांनी केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्तीची समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.