राहुल गांधींच्या भारत जोडोत शहरी नक्षलवादी संघटना:पुरावे सादर करत मुख्यमंत्री फडणवीसांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

राहुल गांधींच्या भारत जोडोत शहरी नक्षलवादी संघटना:पुरावे सादर करत मुख्यमंत्री फडणवीसांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो अभियानात तब्बल 40 शहरी नक्षलवादी संघटना सहभागी झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडोवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काठमांडूमध्ये एक गुप्त बैठक झाली. त्यात भारत जोडोमधील लोकांचा सहभाग होता. देशभरात 180 संघटना अशा आहेत, ज्यांनी भारत जोडोसाठी कार्यक्रम घेतले. त्यातील 40 संघटनांना ‘फ्रंटल ऑर्गनायझेशन’ म्हणून ओळखले जाते. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्या एका निवेदनात या संघटनांचा उल्लेख शहरी नक्षलवादी म्हणून केला होता. 48 संघटनांची यादी ही त्यांच्या काळातील आहे. लोकसभेत मनमोहन सिंह सरकारने 72 ‘फ्रंटल ऑर्गनायझेशन’ची यादी जाहीर केली. त्यातील 7 महाराष्ट्रातील होत्या, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने नक्षलवादाविरोधात लढाई पुकारली. आम्ही केलेल्या कारवायांमुळे नक्षलवाद्यांची साखळी तुटली. नक्षली संघटनांमध्ये नव्याने भरती बंद झाली, तेव्हा या संघटना हळूहळू शहरांकडे वळायला लागल्या. अराजकतेचे विचार नव्या पीढीत रुजवण्यासाठी नक्षली विचारांच्या ‘फ्रंटल’ संघटना सुरू झाल्या. त्यांनाच शहरी नक्षलवादी म्हटले जाते. संविधानाचे नाव घ्यायचे, पण संविधानिक संस्थांबद्दल जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि बंडाची भावना उत्पन्न करायचे त्यांचे प्रयत्न आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार चालणाऱ्या राज्यात नक्षलवाद सुरू करायचा त्यांचा डाव आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना देखील सजग केले आहे. फडणवीस म्हणाले, पाचव्या स्थानावर असलेली भारताची अर्थव्यवस्था सध्या तिसऱ्या स्थानावर झेप घेण्याच्या मार्गावर आहे. हे होऊ न देण्यासाठी काही परकीय शक्ती कार्यरत झाल्या आहेत. अशावेळी ‘डीप स्टेट’साठी परकीय शक्तींकडून खांदा शोधण्याचे काम सुरू आहे. तुम्ही तुमचा खांदा देऊ नका. विरोधी पक्षांनी सजग रहा.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment