अदानीला अटक करण्याची राहुल गांधींची मागणी योग्यच:मुंबईला लुटणाऱ्या उद्योगपतीला हिशोब चुकता करावाच लागेल – पटोले

अदानीला अटक करण्याची राहुल गांधींची मागणी योग्यच:मुंबईला लुटणाऱ्या उद्योगपतीला हिशोब चुकता करावाच लागेल – पटोले

उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींनी देश विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले पण अमेरिकेच्या तपास यंत्रणाच्या तपासात अंबानींने मोठ्या प्रमाणात लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही भ्रष्ट अदानीला अटक का केली जात नाही? भारत सरकारने चौकशी करून गौतम अदानीला जेलमध्ये टाकावे ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी रास्तच आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने व सरकारी यंत्रणांच्या मदतीने अदानी देशाला लुटत आहे. विमानतळ, बंदरे, उर्जानिर्मितीसह सर्वच क्षेत्रात अदानीची मक्तेदारी सुरु असून त्याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. अदानीला देश विदेशातील कंत्राटे देण्यासाठी पंतप्रधान मोदीच मदत करत आहेत हे उघड आहे. लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करण्याचा डाव आखून लाखो कोटी रुपयांची मुंबईतील जमीन अदानीच्या घशात घातलेली आहे. मुंबईचे विमानतळही अदानीलाच दिले आहे. यापाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्कम पाठिंबा आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यांनी अदानीवर कारवाई करण्याची केलेली मागणी रास्तच असून अमेरिका जर गौतम अदानीच्या भ्रष्टाचाराबद्दल अटक वॉरंट काढू शकते तर भारत सरकार का कारवाई करु शकत नाही? भारत सरकारने कारवाई करून देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले. गौतम अदानी यांना अटक करावी – पटोले या संदर्भात पटोले यांनी एका पोस्टच्या माध्यमातूनही अदानी आणि मोदींवर टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये पटोले यांनी लिहिले की, ‘पंतप्रधानांचे घनिष्ठ मित्र गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला आणि अटक वॉरंट जारी होणे ही भारताची बदनामी नाही का? अदानींच्या भारतातील सर्व संशयास्पद व्यवहारांबाबत मा. राहुल गांधीजी आणि कॉंग्रेस पक्षाने संसदेत वारंवार चौकशीची मागणी केली आहे. परंतु सामान्य जनता आणि गुंतवणूकदारांना कवडीमोलाचीही किंमत न देता देशाला लुटण्याचे काम सुरू ठेवले आहे. सेबी प्रमुख माधवी बूच त्यांना वाचविण्याचे काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की झालेली असताना केंद्र सरकारने कडक पावले उचलून अदानी समूहाने केलेल्या ₹२००० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करावी आणि ताबडतोब गौतम अदानी यांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे.’

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment