राहुल सोलापूरकरांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान:जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले – हा शिवरायांची उंची कमी करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मुघलांना लाच दिल्याचे ते म्हणाले. आता या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांना फैलावर घेतले आहे. शिवरायांबद्दल वक्तव्य करून, इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण? अशा शब्दांत आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेबाबत बरेच वादग्रस्त दावे केलेत. औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिल्याचे ते म्हणालेत. सोलापूरकरांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत राहुल सोलापूरकर यांचा समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे, असेही आव्हाड म्हणाले. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. ठाकरे गटाच्या किरणे मानेंनी सुनावले खडेबोल
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने यांनीही राहुल सोलापूरकर यांना खडेबोल सुनावले होते. अशाप्रकारच्या लोकांनी आपली मराठी इंडस्ट्री खच्चून भरलेली आहे! असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतले शेण तसेच आहे. विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेणाऱ्या एका इतिहासद्रोह्यालाही याने खोटे ठरवले, असा घणाघातच किरण माने यांनी केला. कडेकोट बंदोबस्तात तुरुंगात असताना महाराज पैसे चारतात आणि त्यांना ‘लाच दिली’ असे अधिकृत शिक्क्याचे परवाने मिळतात, असा अनागोंदी कारभार चालायला ते ईव्हिएम घोटाळ्याने सत्तेत आलेले सरकार होते की काय? असाही प्रश्न किरण माने यांनी विचारला.