राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, अजूनही वेळ गेली नाही:मनसे नेते बाळा नांदगावकरांची उद्धव ठाकरेंना साद
आम्ही नाती जपली, पण राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, असे म्हणत मनसे नेते व शिवडीचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा साद घटल्याचे दिसून येत आहे. आदित्य ठाकरे वरळीमधून उभे होते तेव्हा आपल्या घरातील व्यक्ती उभा आहे असे समजून राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता. पण अजूनही वेळ गेली नाही, असे बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. बाळा नांदगावकर म्हणाले, माहीमची उमेदवारी आधी आम्ही जाहीर केली, नंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर केली. उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंसमोर उमेदवार द्यायला नको होते. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिलाच पण शिंदे यांनी देखील दिला आहे. मात्र अजूनही वेळ गेली नाही. शेवटी जे काही वैभव, मान-सन्मान आम्हाला मिळाला आहे ते याच ठाकरे कुटुंबामुळे मिळाला आहे. ते जपणे आवश्यक होते. याबाबत विचार व्हायला हवा होता, असे ते म्हणाले. अमित ठाकरे यांच्याविषयी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, अमित ठाकरे मनातून फार हळवे आहेत. अगदी बाळासाहेबांप्रमाणे ते आहेत. सगळे ठाकरे असेच आहेत. अमित ठाकरे निवडणूक लढवतील याबाबत खरेच कल्पना नव्हती. मात्र पक्षातील नेत्यांनी निवडणूक लढायला हवे असे मत त्यांनी मांडले. त्यानंतर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू झाली, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे यांच्या पोटात जे असते तेच ओठात असते, ते जे आहे ते सडेतोड बोलतात. आम्ही नाती जपली पण त्यांनी खरच रक्ताचे नाते जपले आहे. आदित्य उभा होता तेव्हा ठाकरे घराण्यातला व्यक्ती उभा आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी उमेदवार दिला नाही. राजकारणाच्या पलीकडचे नाते जपण्याचे काम कायमच राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच पुढे बोलताना निवडणुकीच्या निकालानंतर जो सत्तेत बसेल तो आमच्याच पाठिंब्यानेच बसेल, असा विश्वास देखील बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.