राज ठाकरेंनी अजितदादांप्रमाणे पहाटे कामाला लागावे:अमोल मिटकरींचा खोचक सल्ला, म्हणाले – स्वत:च्या मुलाच्या पराभवावर भाष्य करावे

राज ठाकरेंनी अजितदादांप्रमाणे पहाटे कामाला लागावे:अमोल मिटकरींचा खोचक सल्ला, म्हणाले – स्वत:च्या मुलाच्या पराभवावर भाष्य करावे

भाजपला 2014 मध्ये 122 त्यानंतर 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना 132 जागा मिळाल्या हे समजू शकतो. मात्र अजित पवार यांना 42 जागा कशा मिळाल्या? यावर कोणाचा तरी विश्वास बसू शकतो का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला. स्वत:च्या घरात झालेल्या पराभवाचा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसला, असे म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांसारखे पहाटे 5 वाजल्यापासून कामाला लागले पाहिजे, असा सल्ला देखील अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना दिला. अमोल मिटकरी यांनी नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करत राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांवर टीका करत आम्हाला मेहनत 42 जागांपर्यंत घेऊन आली, असे प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी दिले. काय म्हणाले अमोल मिटकरी?
राज ठाकरेंना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे. विधानसभेत स्वत:च्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या दीड महिन्यांच्या कालावधीनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 42 जागा कशा आल्या? हा धक्का त्यांना बसला आहे. आम्ही त्यांना सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा ज्याप्रकारे रात्रंदिवस काबाडकष्ट करतात, मेहनत घेतात. मग शेती असेल, कला असेल किंवा राजकारण असेल त्यात मेहनत 42 जागांपर्यंत घेऊन आली आहे, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. आपल्या सुपुत्राचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत, यावर त्यांनी भाष्य करावे. अजित पवारांप्रमाणे पहाटे 5 पासून त्यांनी कामाला लागले पाहिजे. त्याशिवाय अजितदादा नावाचा विकासपुरुष त्यांना कळू शकणार नाही, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना लगावला. आशिष शेलारांचाही राज ठाकरेंवर पलटवार दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपचा देखील समाचार घेतला. यावेळी त्यांनी ज्यांच्यावर आरोप होतो, ते नंतर भाजपसोबत येतात, असा आरोप देखील केला. या आरोपांवरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला. भारतीय जनता पक्षाने तडजोडीचे राजकारण कधीच केले नाही. प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्रनिर्माण या आधारावर राजकारण करताना आम्ही कधीच तडजोड केली नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात जो एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, तो अर्धवट माहितीच्या आधारावर आहे, असे शेलार म्हणाले. काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीवर भाष्य करत निवडणुकांच्या निकालावर संशय व्यक्त केला. भाजपला 2014 मध्ये 122 त्यानंतर 2005 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना 132 जागा मिळाल्या हे समजू शकतो. मात्र अजित पवार यांना 42 जागा कशा मिळाल्या? यावर कोणाचा तरी विश्वास बसू शकतो का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ज्या शरद पवार यांच्या जीवावर आजपर्यंत अजित पवार आणि छगन भुजबळ राजकारण करत आले. त्या शरद पवार यांना केवळ दहा जागा मिळतात? हे न समजण्याची गोष्ट असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीवर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेले आहे. केवळ ते आपल्यापर्यंत आलेले नाही, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले. मात्र केलेले मतदान हे कुठेतरी गायब झाले. अशा प्रकारे जर निवडणूक लढवायच्या असतील तर निवडणूक न लढवलेल्या बरे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment