राज ठाकरेंनी भाकरी फिरवली:मनसेमध्ये मोठे फेरबदल, अमित ठाकरेंवर मोठी जबाबदारी; कोणाला कोणते पद? जाणून घ्या

राज ठाकरेंनी भाकरी फिरवली:मनसेमध्ये मोठे फेरबदल, अमित ठाकरेंवर मोठी जबाबदारी; कोणाला कोणते पद? जाणून घ्या

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष संघटनेत अनेक बदल केले आहेत. रविवारी रवींद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. राज ठाकरे यांनी मनसेमधील नवीन संघटनात्मक बदल आणि रचना आज जाहीर केले आहेत. मनसेने पहिल्यांदाच मुंबईसाठी अध्यक्षपदाची नेमणूक केली असून संदीप देशपांडे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राजपुत्र अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी दिली असून मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेमध्ये आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठे अपयश आले होते. त्यांचा एकही आमदार निवडून आला नाी. या अपयशानंतर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याचे संकेल दिले होते. त्यासाठी त्यांनी पक्षातील पदांचे पुनर्गठन, पदाधिकाऱ्यांची आचारसंहिता आणि इतर महत्त्वाचे मुद्दे यावर विचार करून आराखडा तयार करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आज मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत केंद्रीय समिती स्थापनेसह, मुंबईत महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाला मजबूत कसे करावे, यावर सखोल चर्चा करण्यात आली. काय म्हणाले राज ठाकरे? काय करायचे, कसे करायचे त्याची आखणी 2 एप्रिल पर्यंत सर्वांना मिळेल. शहर रचनेत कामांची रचना आहे काय करायचे आणि काय नाही करायचे, हे सांगितले जाईल, असे राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ज्याला जे काम दिले त्यांनी तेच करायचे. त्यामुळे भांडणे कमी होतील, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. अनेक गोष्टी साचल्या आहेत. ते सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. कोणावर कोणती जबाबदारी? मनसेने आतापर्यंत मुंबईसाठी कधीही अध्यक्षांची नेमणूक केली नव्हती. आता मात्र थेट पहिल्यांदाच मुंबई अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली असून संदीप देशपांडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार तर मुंबई पश्चिम उपनगरपदी कुणाल माईणकर आणि मुंबई पूर्व उपनगरपदी योगेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आले आहे. ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. ठाण्यात कोणावर कोणती जबाबदारी? ठाण्यातही अशीच एक केंद्रीय समिती असेल, त्यात अविनाश जाधव, राजू पाटील, अभिजीत पानसे, गजानन काळे असतील. यामुळे दोन्ही बाजूने पक्ष बांधला जाईल, अशी रचना केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही रचना लावण्यात येईल. सध्या मुंबई आणि ठाण्यात केलेला हा बदल आहे. एप्रिल-मे महिन्यात महाराष्ट्रात ही रचना होईल” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली संदीप देशपांडे काय म्हणाले? महत्त्वाची जबाबदारी आहे. खूप मोठी जबाबदारी आहे. मोठा विश्वास दाखवला आहे. आमचे सर्वात पहिले काम असेल, मिशन मुंबई. आता लवकरच स्ट्रिम लाइन होईल. मुंबई महापालिका जोरात, जोमात लढवली जाईल. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू. नेमणुकांचा विचार हा राज ठाकरे यांनी केला असेल. निश्चितपणे मुंबई महापालिकेत बदल दिसेल. आजपासून मनसे मिशन महापालिका सुरु, असे संदीप देशपांडे म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment