राज- उद्धव ठाकरे यांच्यात भावनिक ओलावा- संजय राऊत:पण शरद पवार- अजित पवार केवळ संस्थात्मक कामासाठी एकत्र असल्याचा दावा

राज ठाकरे सध्या मुंबईत नाहीत. ते कोणत्या ठिकाणी गेले हे मला माहित नाही. मात्र सध्या ते मुंबईत नाहीत. राज ठाकरे यांनी हात पुढे केला आहे आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र सध्या ते मुंबईत नाहीत. ते दोघे परत आल्यानंतर याविषयी चर्चा करू. मात्र यावर सध्या रोज चर्चा करून त्याचे गांभीर्य कमी करण्याचा काहीही उपयोग नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जसे नाते आहे, त्यासाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीची किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची दोघांमध्ये चर्चा करण्याची आवश्यकता नाही. या दोघांचे नाते काय? हे मी सुद्धा अनेक वर्षे पाहिले आहे. मी देखील त्या प्रवाहामध्ये होतो. त्या दोघांच्या एकमेकांविषयी भावना काय आहेत? त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना काय आहेत? याची मला जाणीव देखील आहे. मात्र राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात. या संदर्भात उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे आपल्याकडून नुकसान होऊ नये, त्यासाठी उद्धव ठाकरे यांची भूमिका अत्यंत सकारात्मक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले असले तरी भावनिक ओलावा असतोच सकाळीच उद्धव ठाकरे आणि माझी चर्चा झाली आहे. दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या. आम्ही देखील त्यांच्यासोबत असणार आहोत. मी तर दोन्ही घरचा पाहुणा आहे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे किंवा आम्ही बराच कालखंड एकत्र राहिलेलो माणसे आहोत. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांचे आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते संबंध होते. आमचे सर्वांचे भावनिक नाते आहे. राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले असले तरी भावनिक ओलावा असतोच. आणि तो राहिला देखील पाहिजे. शरद पवार यांच्याशी देखील आम्ही अनेक वर्ष भांडत होतो. मात्र आमच्यातील भावनिक ओलावा कायम असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाने एकत्र येण्यासाठी संपर्क केला महाराष्ट्रासाठी ज्यांना ज्यांना एकत्र यायचे आहे, त्यांनी एकत्र यावे. यासंदर्भात रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाने या एकत्र येण्यासाठी मला संपर्क केला असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली. जर दोन ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा विचार करत असतील, तर तर रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांना देखील या प्रवाहात एकत्र यावे वाटत असेल तर चांगलेच आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याच पद्धतीने अनेक लोक महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्यात पुढे येत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. केवळ संस्थात्मक कामासाठी शरद पवार – अजित पवार एकत्र पोटात एक आणि ओठात एक असा महाराष्ट्र राज्य कधीच नव्हता. आम्ही यशवंतराव चव्हाण पासून ते पाहिले आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी जिवाचे रान करत आहेत. शरद पवार हे देखील त्यांच्या अधिकृत पक्षा साठीच काम करत आहेत. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले आहेत, ते केवळ त्यांच्या संस्थात्मक कामासाठी. असे म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये अहंकार किंवा कटुता नाही लोक भावनेचा विचार करूनच उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. दोघांनी एकत्र आले पाहिजे, ही लोक भावना आहे आणि ती सर्वांनी समजून घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये कोणताही अहंकार नाही किंवा कटुता देखील नाही. हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात वैयक्तिक वाद आहे का? राजकीय भांडणामुळे मैत्री तुटत नसते. त्यामुळे आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात कोणते वैयक्तिक भांडण आहे. ते वैयक्तिक आहे का? हे पाहावे लागेल. मात्र, राजकीय भांडणांमुळे मैत्री तुटत नसते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्याशी मैत्री तुटली असे शेलार जाहीर केले होते, यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.