राज्यात अवकाळी पावसाचा कहर:भंडाऱ्यात अंगावर वीज पडून दोन जण ठार, मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

राज्यात अवकाळी पावसाचा कहर:भंडाऱ्यात अंगावर वीज पडून दोन जण ठार, मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पाथरी येथे स्वतःच्या शेतात काम करीत असलेल्या दोन जणांच्या अंगावर विज पडुन जागीच ठार झाल्याची घटना 3 एप्रिल रोजी दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली. प्रमोद मनिराम नागपुरे (45) व मनिषा भारत पुष्पतोडे (27) दोघेही रा.पाथरी असे मृतक महीला व पुरुष शेतकऱ्यांचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील 3 एप्रिल रोजी सकाळपासून हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार आकाशात ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला होता. त्या धर्तीवर जिल्ह्यात घटनेच्या दिवशी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान पाथरी येथील प्रमोद नागपुरे व मनिषा पुष्पतोडे हे स्वतःच्या शेतावर वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी शेतीचे काम करण्यासाठी शेतावर गेले होते. शेतावर काम करत असताना रिपरिप पावसाला सुरुवात झाल्याने दोघेही शेतालगत असलेल्या झाडाखाली असलेल्या झोपडीत पावसापासून बचावासाठी गेले असता अचानकपणे आकाशात विज कडाडली आणि विज झाडाखाली असलेल्या झोपडीवर पडली. यात दोघेही विजेच्या धक्क्याने जागिच ठार झाले‌. मनिषा पुष्पतोडे यांच्या मृत्यू पश्चात पती, दोन मुले, सासू, सासरे आहेत तर प्रमोद नागपुरे यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान येथिल सरपंच विद्या कोहरे, उपसरपंच रुषीकुमार खुणे हे देखील घटनास्थळी दाखल होत सदर घटनेची माहिती तहसीलदार, तलाठी, पोलीस स्टेशन गोबरवाहीला देण्यात आली. दरम्यान घटनास्थळी पोलीस,तलाठी, यांनी घटनास्थळाचा पंचानामा करु़न मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेची नोंद गोबरवाही पोलीसात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस दरम्यान, महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने जोर धरला असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही गारा पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अनेक भागत पडला. पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कराड येथील वीट भट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच पिकांचे सुद्धा नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नाशिकच्या द्राक्षांचे नुकसान वाशिम जिल्ह्यात बाजारपेठेत असलेली हळद पावसात भिजल्याने व्यापारी वर्गाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिक येथील प्रसिद्ध द्राक्ष सुद्धा अवकाळी पावसात खराब झाले आहेत. इतकेच नव्हे तर कांद्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदरीतच अवेळी आलेल्या या पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, त्याच सोबत व्यापारी वर्गालाही पावसाचा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment