रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचे प्रकरण:3 आरोपी अद्यापही फरार; पुन्हा एकदा पोलिसांवर प्रश्नचिन्ह?

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्या प्रकरणी पोलिसांमध्ये सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण अल्पवयीन आहे. तर दुसरीकडे आणखी तिघे जण पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत. यामध्ये पीयूष मोरे, चेतन भाई आणि सचिन पालवे यांचा समावेश आहे. हे तिघेही अद्याप फरार आहेत. केंद्रीय मंत्र्यांची छेड काढल्यानंतरही तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नसल्यामुळे आता हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते. रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी सुरक्षारक्षकांसोबत या जत्रेमध्ये गेली होती. यावेळी काही टवाळखोर तरुण त्यांचे परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांनी या तरुणाच्या हातामधील मोबाईल हस्तगत करून त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट केली होती. हा प्रकार समजल्यानंतर रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आक्रमक पावित्रा घेतला होता. छेड खानी करणाऱ्या टवाळखोरांना अटक करावी, अशी मागणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली होती. इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जाते तर सर्वसामान्य मुलींचा काय होणार? असा सवालही रक्षा खडसे यांनी पोलिसांना केला होता. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यामध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. आरोपी विशिष्ट पक्षाचे, तरी माफी नाही – फडणवीस या छेडछाड करणाऱ्यांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. यापैकी काहींना अटक केलेली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. आरोपींवर कडक कारवाई होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.