राणेंना संपवता संपवता तुमचे काय झाले बघा:उद्धव ठाकरेंवर नीलेश राणेंचा हल्लाबोल, म्हणाले – चांगले वागला नाहीत म्हणून ही परिस्थिती आली
महायुती सरकारची मंत्रिमंडळाची शपथविधी आज नागपूर येथे पार पडली. यावरून आता आमदार नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. श्री उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही 2005 पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले होते, असे म्हणत नीलेश राणे यांनी बोचरी टीका केली आहे. आमदार नीलेश राणे म्हणाले, श्री उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही 2005 पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळाले पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागला नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली. पुढे नीलेश राणे म्हणाले, राणेंना संपवता संपवता तुमचे काय झाले बघा. आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणे पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल, अशी टीका नीलेश राणे यांनी केली आहे. नागपूरच्या राजभवन परिसरात राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारात 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. त्यामध्ये, राणेपुत्र आमदार नितेश राणे यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. कणकवली मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार बनलेल्या नितेश राणे यांना भाजपने मंत्रिपदावर बसवले आहे. यावरूनच नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.