रणजित कासलेंवर तिसरा गुन्हा दाखल:व्यवसायिकाकडून 6 लाख रुपये घेतल्याचा आरोप, अंबाजोगाईत तक्रार दाखल
बीड येथील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्याविरोधात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. अंबाजोगाई येथील एका व्यवसायिकाकडून 6 लाख रुपये घेतले पण वारंवार मागणी करून उसने घेतलेले पैसे परत केले नाहीत, असा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईच्या उपचारासाठी म्हणून हे पैसे घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकची माहिती अशी की, रणजित कासले जेव्हा अंबाजोगाई येथे कार्यरत होते, तेव्हा त्यांची सुधीर चौधरी नामक व्यवसायिकाशी मैत्री होती. या मैत्रीतून रणजित कासले यांनी आईच्या उपचारासाठी म्हणून 6 लाख रुपये उसने घेतले होते. पण वारंवार मागणी करूनही पैसे परत न केल्याने सुधीर चौधरी यांच्या तक्रारीनुसार अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत रणजित कासले यांनी व्हिडिओ शेअर करत अनेक खळबळजनक दावे केले होते. धनंजय मुंडे यांच्यावर देखील गंभीर आरोप त्यांनी केले होते. तसेच आपल्याला निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशीनपासून दूर राहण्यासाठी वाल्मीक कराडच्या कंपनीकडून 10 लाख रुपये दिले होते, असेही कासले यांनी सांगितले होते. सध्या रणजित कासले शिवाजीनगर पोलिसांच्या कोठडीत आहे. या काळात कासले यांच्यावर परळी आणि अंबाजोगाई येथे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. रणजित कासले यांनी केलेल्या दाव्यावर वाल्मीक कराडची कंपनी बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रणजित कासले यांना देण्यात आलेले 10 लाख रुपये हे त्याच्या मुलांच्या शाळेच्या फी साठी दिल्याचा दावा सुदर्शन काळे यांनी केला आहे. आपले पैसे मिळावे यासाठी काळेने बीड पोलिसांना गेल्या महिन्यात अर्ज दिला होता. कासले यांनी साडेसात लाख रुपये पुन्हा दिल्याचे काळे यांनी म्हटले आहे. परंतु ईव्हीएम पासून दूर राहणे, वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करणे या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सुदर्शन काळे यांनी म्हटले आहे.